
केवळ शासनाच्या तांत्रिक परवानगीचीच प्रतिक्षा!
कुलगुरू डाॅ. सुभाष चौधरी यांनी संस्थाचालक महासंघाच्या पदाधिकार्यांची मागणी केली मान्य!
विद्यापीठ महाविद्यालयांकडुन साफ्टवेअरच्या चुकीमुळे आकारत असलेल्या अतिरिक्त शुल्कावर सुध्दा तोडगा काढणार!
नागपूर,दि.02ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ नागपुरच्या अमरावती रोड वरील सर्व प्रशासकीय आस्थापनांना महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर असे नांव दिलेले आहे. या शैक्षणिक परिसरात अमरावती रोडवरील विद्यापीठाच्या प्रवेशव्दारावर लवकरच महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात येईल. फक्त शासनाकडुन केवळ तांत्रिक परवानगीची प्रतिक्षा असल्याचे नागपुर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.सुभाष चौधरी यांनी विद्यापीठ महाविद्यालयीन संस्थाचालक महासंघाच्या शिष्टमंडळाला सांगितले.
नागपुर विद्यापीठाच्या प्रवेशव्दारावर महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्यातील योगदान म्हणुन, त्याचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, याबाबतचा रितसर ठराव नागपुर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांनी व मॅनेजमेंट कौन्सिलनी, संपुर्ण येणार्या खर्चासह मंजुर केलेला आहे. फक्त तांत्रिक मंजुरीसाठी तो शासनाकडे प्रलंबित आहे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला दिडशे वर्ष पुर्ण होत आहे. तसेच नागपुर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव सुरू आहे. याच काळात हा पुतळा बसविण्यात यावा, अशी शिष्ठमंडळाने मागणी केलेली होती. त्या शिवाय विद्यापीठामधे व संलग्नित महाविद्यालयांमधे, मराठवाडा विद्यापीठाच्या धर्तीवर सत्यशोधक चळवळी व महात्मा फुले यांचे कार्यावर भाषणमाला आयोजित करण्याची मागणी करून तसे विद्यापीठाने परिपत्रक काढावे अशी मागणी करण्यात आली. त्याला कुलगूरूंनी तत्काळ मान्यता दिली.
या वर्षी नागपुर विद्यापीठ विद्यार्थी नामांकनासाठी ८० रूपये फी घेण्याऐवजी, जी फी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांकडुन मिळालीच नाही, व वर्षभरानंतर शासनाकडुन ती मिळणार आहे, ती आगावु सुमारे ५०० रूपये साफ्टवेअरच्या माध्यमातुन आकारत आहे. यावर महाविद्यालयीन संस्थाचालक महासंघाने तिव्र आक्षेप नोंदविला. त्यावर यावेळी सुध्दा केवळ नामांकनाचीच फी घेतली जाईल. पण एमकेसीएल या कंपनीचा करार संपल्यामुळे, व दुसरी कंपनी अजुन नियुक्त न झाल्यामुळे, त्या साफ्टवेअर मधे बदल करता येत नाही. तरी सुध्दा यावर लवकच तोडगा काढण्यात येईल,तसेच संस्थांच्या महाविद्यालयांना अतिरिक्त फी भरण्याचा भुर्दंड बसवणार नाही, विद्यार्थ्यांचे परीक्षेचे नुकसान होवु देणार नाही, असे आश्र्वासन शिष्ठमंडळाला कुलगूरूंनी दिले. तसेच विद्यापीठाच्या निवडणुका संपल्यावर, विद्यापीठाच्या शताब्दी वर्षात संस्थाचालकांचा सुध्दा सक्रिय सहभाग असावा, त्यांच्या समस्या अडचणी समजावुन तसे निर्णय विद्यापीठाला घेता यावेत म्हणुन, लवकरच विद्यापीठात संस्थाचालकांची सभा घेण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ.सुभाष चौधरी यांनी शिष्ठमंडळाला सांगितले.
या वेळी कुलगुरू डाॅ. चौधरी यांना संस्थाचालक महासंघाचे मुख्य समन्वयक, महात्मा फुले समता परीषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांनी महात्मा फुले यांचे समग्र वांड:मय हे पुस्तक देऊन कुलगुरूंचे स्वागत केले. या शिष्ठमंडळात, प्रा. दिवाकर गमे,सुषमाताई भड, डाॅ. नरेशचंद्र काठोळे,संचालक आयएएस मिशन,प्रा. रमेश पिसे,ई के हरदास,सत्यशोधक समाज,कर्नल राजु पाटील,मोहन टोंगे,प्रा. व्ही एन शिंदे,सुभाष नलंगे डाॅ.किशोर सुरडकर,राजेंद्र पाटील,डाॅ.संजय ढोबळे,डाॅ. चिमणकर,अॅड. मनमोहन बाजपेयी,शिलवंत मेश्राम व संस्थाचालक महासंघाचे विविध प्रतिनिधी सहभागी झाले होते.





