
विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करत राहिले तर अविश्वास ठराव आणण्यावर विचार करु.
फोन टॅपिंग प्रकरणात सरकार दोषींना पाठीशी का घालत आहे?
नागपूर, दि. २२ डिसेंबर २०२२- राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना २०१६- १७ साली अवैधरितीने लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. चौकशी समितीनेही त्यांना दोषी ठरवले असताना त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न ईडी सरकार करत आहे. हे प्रकरण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री असतानाचे असून आताही तेच गृहमंत्री आहेत. फोन टॅपिंग प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
— Nana Patole (@NANA_PATOLE) December 22, 2022
विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकप्रतिनिधी, पत्रकार व अधिकारी यांची वेगळी नावे ठेवून त्यांचे फोन टॅप केले गेले. हा आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यांवरचा घाला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी ब्लॅकमेलिंगची व्यवस्था केली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना रश्मी शुक्ला या आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांची चौकशी झाली, रश्मी शुक्ला यांनी चूक झाल्याचेही मान्य केले होते पण राज्यात ईडीचे सरकार येताच फोन टॅपिंग प्रकरण दडपण्याचे काम केले जात आहे. पुणे पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला परंतु मा. कोर्टाने ताशेरे ओढत अधिक चौकशीची गरज असल्याचे सांगितले. फोन टॅपिंग गंभीर गुन्हा असताना सरकार या गुन्हेगारांना पाठीशी का घालत आहे? फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी क्लिनचिट देण्याचा सपाटाच लावला होता आताही तोच प्रकार सुरु आहे.
रश्मी शुक्ला फोन टॅप प्रकरण हे अत्यंत गंभीर असून 'ईडी' सरकार असंविधानिक गोष्टींना पाठीशी का घालत आहे?#हिवाळीअधिवेशन2022 pic.twitter.com/0YHpGehr6J
— Nana Patole (@NANA_PATOLE) December 22, 2022
सभागृहात आज आम्ही नियम ५७ अन्वये फोन टॅपिंग प्रकरणी चर्चा करण्याची मागणी केली परंतु अध्यक्ष महोदयांनी आम्हाला बोलू दिले नाही. एकतर्फी कामकाज सुरु आहे. सभागृहाच्या सदस्याला संरक्षण देण्याचे काम अध्यक्षांचे आहे परंतु आमच्या अधिकारांचे रक्षणही केले जात नाही. अध्यक्षांनी पक्षपातीपणे वागू नये, नियमांनी सभागृह चालवण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते पण त्यांनी आम्हाला बोलू दिले नाही म्हणून आम्ही सभात्याग केला आहे. अध्यक्ष जर असेच पक्षपाती वागत राहिले तर त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा विचार आम्ही करू असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.