कृषी विद्यापीठांना संशोधन कार्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

0
9

नागपूर, दि. २२: शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासन कार्य करीत आहे. उत्पादन  खर्च कमी करून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी, या दिशेने शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये सुरु असलेले संशोधन कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता शासन कृषी विद्यापीठांना सर्वतोपरी सहाय्य करेल, असे आश्वासन कृषीमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रति कुलपती अब्दुल सत्तार यांनी दिले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर स्थित कृषी महाविद्यालयाच्या (बजाजनगर) कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन श्री. सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मोरेश्वर वानखडे, केशव तायडे आदी उपस्थित होते.

श्री. सत्तार म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन चांगले निर्णय घेत आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. शेतकऱ्यांना उत्तम वाण व आधुनिक यंत्रसामग्री मिळावी यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये संशोधनकार्य सुरु आहे. विदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही उत्तम कामगिरी करीत १७६ वाण आणि ४३ शेतकी यंत्र विकसीत केली आहेत. संशोधनाचे हे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता शासनाकडून कृषी विद्यापीठांना सर्वतोपरीत सहाय्य करण्यात येत आहे. याच श्रृंखलेत विद्यापीठाच्या नागपूर येथील ११६ वर्ष जुन्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची सुंदर इमारत उभी राहिली आहे. आता येथे देश-विदेशातील शास्त्रज्ञांना राहण्याची उत्तम सोय होईल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शने आयोजित करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी  राज्य शासनाकडून आवश्यक मदत करण्यात येईल, असे आश्वासनही श्री. सत्तार यांनी दिले.

सिल्लोड येथील कृषी प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन

सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’म्हणून देशभर साजरे केले आहे. त्यानिमित्त सिल्लोड जि. औरंगाबाद येथे येत्या १ ते ५ जानेवारी  दरम्यान ‘कृषी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठ आणि महाबीजचे एकूण ६०० स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. तसेच, कृषी संबंधीत विविध कंपन्याही सहभागी होणार आहेत. कमी उत्पादन खर्चात किफायतशीर शेती करण्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन याठिकाणी उपलब्ध असेल. या प्रदर्शनात राज्यातील शेतकरी, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. सत्तार यांनी केले.

कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी कृषी विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या कार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

अशी आहे वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची वास्तू

येथील बजाजनगर भागात एकूण ८७७ चौ.मिटर परिसरात कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची इमारत आहे. यात ४ व्हीआयपी तर अन्य ८ असे एकूण १२ कक्ष आहेत. दोन वर्षांत ही इमारत पूर्णत्वास आली असून यासाठी राज्यशासनाकडून २ कोटी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.