डिझेल चोरी करताना देवपायलीचा पोलिस पाटील रंगेहात अडकला

0
25

सडक अर्जुनी-राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहतात. त्यातल्यात्यात राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाचे साहित्य ठिकठिकाणी पडून असतात. मात्र वाहनातून इंधन चोरी, माल चोरी व बांधकामाचे साहित्य चोरी होण्याचे अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांवर आळा घालण्यासाठी देवरी पोलिस गस्त घालत असताना उभ्या वाहनातून पोलिस पाटील इंधन चोरी करताना रंगेहात अडकला. या घटनेतील चोरी करताना सापडलेल्या देवपायली येथील पोलिस पाटलाचे नाव सुरेश बोरकर असे आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर जड व मालवाहक वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातल्यात्यात या मार्गावर ढाबे व हॉटेल आहेत. त्यामुळे रात्री पाळीत विर्शामासाठी चालक वाहने उभे करून थांबत असतात. याच संधीचा लाभ घेत वाहनातील माल व डिझेल चोरी करणारी भुरट्या चोरांची टोळी गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. त्याचबरोबर मार्गाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍या साहित्याचीही चोरी मोठ्या प्रमाणात होत असते. एवढेच नव्हेतर रस्त्यावर अपघात झाले तर त्या वाहनातील माल व इतर साहित्य लंपास केला जाते. हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातल्यात्यात देवरी पोलिसांनी गस्त दरम्यान डिझेल चोरी करणार्‍या टोळीच्या एका मुख्य सुत्रधाराला रंगेहात अटक केली.
देवरी पोलिस गस्त घालत असताना मासुलकसा घाटाजवळ उभा असलेल्या ट्रकमधून रात्रीच्या अंधारात इंधन चोरीत करताना देवपायली येथील पोलिस पाटील सुरेश बोरकर याला रंगेहात पकडण्यात आले. डिझेल चोरी करण्यात आलेला ट्रक क्र.एमएच-३५/एजे-२६८५ असे आहे. मात्र या घटनेमुळे मार्गावर होणार्‍या वाहनांच्या साहित्याची चोरी व इतर वाटमारीच्या घटनांमधील आणखी काही आरोपींचा सहभाग असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.