
लोकप्रतिनिधींकडे शेतकऱ्यांची मागणी : धापेवाडा टप्पा-२ पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत
मोहाडी : तालुक्यातील करडी परिसरातील देव्हाडा, निलज बु., नवेगाव, मोहगाव कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. सिंचनाच्या फारशा सुविधा या भागात नाहीत. धापेवाडा टप्पा-२ पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी यासाठी शासनदरबारी समस्या उचलून धरावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तत्कालीन सर्वच सत्तापक्षातील स्थानिक नेत्यांनी शेतकऱ्यांना धापेवाडा टप्पा २ चे पाणी उपलब्ध करण्याचे लॉलीपॉप दाखविले होते. परंतु आता हेच लोकप्रतिनिधी मूग गिळून आहेत. सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने वंचित गावातील शेतकऱ्यांत धापेवाडा योजनेचे पाणी उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा आहे. ‘सुरेवाडा नाही तर धापेवाडा सही’ असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचा टप्पा -१ पूर्ण झाला आहे. टप्पा क्रमांक २ चे जलपूजन १ मार्च २०१४ रोजी करण्यात आले. तेव्हापासून प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या सिंचन योजनेचे पाणी मोठ्या पाईपच्या माध्यमातून चोरखमारा, बोदलकसा तलावात सोडण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यात भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, साकोली या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिरोडा तालुक्यातील चोरखमारा तलावात धरणातील पाणी सोडल्यानंतर कालव्यांतून थेट करडी क्षेत्रातील निलज बूज, जांभळापाणी, देव्हाडा बूज, नरसिंहटोला, देव्हाडा खुर्द, निलज खुर्द, मोहगाव, नवेगाव परिसरातील मालगुजारी तलावांमध्ये सोडता येते. या योजनेमुळे मोहाडी तालुक्यातील गावांना फायदा मिळणे शक्य होईल. त्यामुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प शक्य तेवढ्या लवकर होणे गरजेचे आहे.
वैनगंगेमुळे करडी परिसराचे नुकसान
वैनगंगा नदीमुळे मोहाडी तालुका दोन भागात विभाजीत आहे, करडी परिस- रातील गावे नदीकाठी असतांना पाण्याचा प्रत्यक्षात शेतीसाठी उपयोग होत नाही. सुरेवाडा योजना करडीच्या उत्तरेला असलेल्या निलज खुर्दपर्यंत प्रस्तावित आहे. परंतु, मोहगाव नाल्यामुळे योजनेचे पाणी निलज बुज, निलज खुर्दचा उर्वरित क्षेत्र, मोहगाव, नवेगाव, देव्हाडा बुज पर्यंत पोहोचविणे शक्य नाही. अशावेळी धापेवाडा उपसा सिंचन योजना वरदान ठरणारी आहे.
सुरेवाडा प्रकल्पामुळे वाढल्या अपेक्षा
ऑक्टोबर महिन्यात तीन वर्षांपासून प्रलंबित सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या ३३६ कोटी २२ लाख इतक्या सुधारित प्रस्तावास मान्यता मिळाली. या प्रकल्पामुळे भंडारा तालुक्यातील सात, मोहाडी तालुक्यातील २० व गोंदिया जिल्ह्यातील एका गावाला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. मात्र, करडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक गावांना या योजनेतून वगळण्यात आले. यासाठी जुन्या सिंचन व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये धापेवाडा प्रकल्पासंबंधीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. धापेवाडाचे पाणी करडी परिसराला उपलब्ध झाल्यास सिंचनाची समस्या दूर होवून शेती सुजलाम-सुफलाम होण्यास मदत होईल.