
सालेकसा,दि.03ः- सालेकसा पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या हद्दीतून 02 जानेवारी 2023च्या रोजी मध्यरात्री सीमावर्ती,नक्षलग्रस्त जंगल भागाचा फायदा घेऊन मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातून कत्तलीकरिता नेण्याकरीता जनावरे पानगाव व कहाली गावाच्या मध्ये असणाऱ्या निर्मनुष्य जंगल परिसरात ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.त्या माहितीच्या आधारे सालेकसा पोलिसांच्या पथकाकने धाड घातली असता 8-10 ग्रुप मध्ये 10-15 ठिकाणी गौवंशाची जनावरे कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने बांधून ठेवण्यात आल्याचे दिसून आले.ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी 2 जानेवारीच्या रात्रीचे 12.30 वा.पासून 03 जानेवारीच्या सकाळी 09.00 वा.पर्यंत घटनास्थळ परिसरात शोध मोहीम राबवून वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून ठिक-ठिकाणी बांधलेली 140 गौवंशाची जनावरांची सुटका केली.जनावराना चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी व सांभाळण्यासाठी गौशाळेत जमा करण्यात आली असून सालेकसा पोलीस ठाणे येथे कलम 5(अ)(2),5(ब),6 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम 11 (च)(ज)(झ) प्राण्यांना निर्दयतेणे वागविण्यास प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर कारवाईमुळे परिसरातून पोलिसांचे कौतूक होत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर व उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव विजय भिसे यांचे मार्गदर्शनात सालेकसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांचे नेतृत्वात पो.उप.नि.मुंडे, स.फौ.चौबे, ना.पो.शी निमजे ना.पो.शी.अग्निहोत्री, पो.शी.अजय इंगळे, पो.शी.सुजित बनसोड व इतर कर्मचारी यांनी केलेली आहे.