33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News विश्व मराठी संमेलनातही विदर्भाला डावलले – अ.भा. साहित्य परिषदेने वेधले लक्ष

विश्व मराठी संमेलनातही विदर्भाला डावलले – अ.भा. साहित्य परिषदेने वेधले लक्ष

0
43

blank

गोंदिया,दि.04ः- राज्य सरकारच्यावतीने आज ४ जानेवारीपासून ६ जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. होऊ घातलेल्या विश्व मराठी संमेलनात वैदर्भीयांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेल्या या संमेलनात वैदर्भीयांचा सहभाग अभावानेच दिसत असल्याबद्दल अखिल भारतीय साहित्य परिषद, नवी दिल्ली, विदर्भ प्रांताचे अध्यक्ष लखनसिंह कटरे, कार्याध्यक्ष अविनाश पाठक व गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष गोवर्धन बिसेन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून या प्रकारची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
निवेदनात या संमेलनाची प्रसारित झालेली माहिती बघता यात राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने फक्त मुंबई पुणे परिसरात असलेल्या कलाकार, साहित्यिक आणि तत्सम मंडळींचा समावेश करण्यात आला आहे, असे दिसते. महाराष्ट्राच्या एका टोकाला विदर्भ नावाचा प्रदेश आहे, याचे साधे भानही भाषा विभागातील अधिकाऱ्यांना नसावे असे जाणवत असल्याचे म्हटले आहे.
विदर्भाचा प्रदेश हा पुरातन काळापासून सारस्वताची जन्मभूमी म्हणून ओळखला गेला आहे. विदर्भ कालीदास व भवभूतींची कर्मभूमि राहिलेली आहे. आजही इथे अनेक मान्यवर साहित्यिक, कलावंत आणि सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते महाराष्ट्राचं नव्हे तर जगाच्या नकाशावर आपले स्थान निर्माण करीत आहेत. असे असतांना विदर्भाकडे या मराठी भाषा विभागाचे इतके दुर्लक्ष व्हावे, हे विदर्भावर अन्याय करणारे ठरते.
यापूर्वी यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार वितरणातही विदर्भावर अन्याय करण्यात आला आहे, याकडे आम्ही लक्ष वेधले. तसे पत्रही मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांना पाठवले होते. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात साहित्य परिषदेतर्फे त्यांना या विषयावर शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळही मागण्यात आली होती, मात्र ती वेळ देण्यात आली नाही हे सखेद नमूद करावेसे वाटते.या पार्श्वभूमीवर या एकूण आयोजनाबद्दल चौकशी केली जावी, आणि विदर्भावर अन्याय करणाऱ्या या मराठी भाषा विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी, अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ शाखेच्या वतीने आम्ही आपणास करत आहोत,असे म्हटले गेले आहे.

blank