23.7 C
Gondiā
Sunday, August 30, 2026
Home विदर्भ तळोदी (बाळापूर)येथे उत्साहात कलार सेवा संस्थेचा सत्कार समारोह

तळोदी (बाळापूर)येथे उत्साहात कलार सेवा संस्थेचा सत्कार समारोह

0
21

नागभिड,दि.09ः  अखिल कलार समाज सेवा संस्था, तळोदी (बाळापूर) च्या वतीने कलार समाज मेळावा, समाज प्रबोधन, गुणवंत/नामवंतांचा सत्कार समारोह, उपवर-वधु परिचय संमेलन व महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिर्थराज ते. उके (संस्थापक अध्यक्ष, युवा कोसरे कलार समाज संस्था, जिल्हा-गोंदिया )होते.उद्घाटन डाँ.सतीशभाऊ वारजूरकर (माजी जि.प.अध्यक्ष, चंद्रपूर तथा गटनेते, जि.प.चंद्रपूर) यांनी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने सौ. संगीताताई ठलाल (साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ती,कुरखेडा जि.गडचिरोली), प्रा.डॉ.  क्रष्णाजी राऊत (प्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक , प्रबोधनकार, ब्रम्हपुरी) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी अखिल कलार समाज सेवा संस्था, तळोदी (बाळापूर) ता.नागभीड, जि.चंद्रपूरचे अध्यक्ष वसंतराव उईके, सचिव प्रमोद शिवणकर, कोषाध्यक्ष सतीश मेश्राम, उपाध्यक्ष मनोहर डी. मेश्राम,प्रा. मनोहर मेश्राम, कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सदस्यगण, महिला कार्यकारिणी पदाधिकारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

याप्रसंगी तिर्थराज ते. उके यांनी समाज संमेलनांची आवश्यकता, महत्त्व व समाजवर्गीयांची कार्यक्रमात उपस्थितीची आवश्यकता व समाज संघटनेच्या एकतेची गरज यांवर प्रकाश टाकला. आजच्या काळात समाज उपवर-वधू परिचय संमेलनाची , होतकरू गुणवंतांची/नामवंतांची उपयोगिता यांवर ही विचार व्यक्त केले. तसेच ओबीसी प्रवर्गातील एक घटक जात म्हणून कलार समाजाने ओबीसी आंदोलनात आपल्या हक्क -अधिकारासाठी पुढे यावे , नेत्रदान, रक्तदान, अवयवदान या शासनाच्या समाज कल्याणकारी मोहिमेत सहभागी होऊन आदर्श समाज निर्माण करावा, त्याचप्रमाणे परिवारातील कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यानंतर अंतिम यात्रेप्रसंगी झालेल्या विधवेचे नात्यातील एखाद्या विवाहित स्त्रीच्या हातून कुँकू पुसणे, तिच्या हातातील बांगड्या फोडणे, तिचे गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, या जुन्या बुरसट प्रथेला बंद पाडून विधवेला ही समाजात मानाचे स्थान द्यावे, धार्मिक , सामाजिक कार्यक्रमात ही समाजातील विधवांना सहभागी करून घ्यावे, तसेच घरातील परिस्थिती बेताची असूनही कर्जबाजारी होऊन म्रत्यूभोजच्या नावाखाली गाँवभोजन देणे , या प्रकाराला आळा घालून मोजक्या व महत्वपूर्ण नातेवाईकांत म्रत्यूभोज कार्यक्रम करावा असे विचार मांडले.