सातबारावर चढविलेली बोगस नावे कमी करण्यासाठी शेतकऱ्याची पायपीट
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील घोगरा येथील शेतकरी शामराव यादवराव खळोदे यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर यंत्रणेच्या चुकीमुळे चार व्यक्तींची नावे चढविण्यात आली. सातबारावर कुटूंबाव्यतिरिक्त असलेल्या त्या व्यक्तींची नावे कशी चढविण्यात आली, याबाबत विचारणा केली असता महसूल यंत्रणेचे अधिकारी उलट शिरजोरी करून त्रास देत आहेत. या प्रकाराला संतापून शेतकरी शामराव खळोदे यांनी कुटूंबासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यामुळे सुड घेणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई होणार काय? याकडेही लक्ष लागले आहे.
वडिलोपार्जित शेतीच्या सातबारावर वारसाने नसलेल्यांची नावे चढविण्यात आल्याचा आरोप करीत ती नावे कमी करण्यासाठी एका शेतकऱ्याची गेल्या चार वर्षांपासून तलाठी, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात पायपीट सुरू आहे, न्याय न मिळाल्याने त्यांनी आता ग्रेट महसूलमंत्र्यांकडे धाव घेतल्याची माहिती घोगरा येथील शेतकरी शामराव खळोदे यांनी आयोजित पत्र परिषदेत दिली.तसेच दिलेल्या माहितीनुसार वडिलोपार्जित शेतजमीन चार गटात आहे. त्यात १८२,१८७,१७६, ११ या गटांचा समावेश आहे. या चारही गटांवर वारसान हक्क म्हणून आमच्या व्यतिरिक्त मालन वासुदेव आगे, केशर तेजराम उपवास, अन्नु ग्यानीराम नागपुरे, बिरन गोपाळ सांडील यांचे नाव चढविण्यात आले आहे. ही नावे सातबारावर कशी का आली? याबाबत चौकशी केली असता तलाठी यांनी फेरफारनुसार झाले आहेत, असे सांगितले. ही नावे कमी करण्यासाठी त्यांनी काही कागदपत्रांची पुर्तता करण्याचा सल्ला दिला. त्यानुरूप सदर व्यक्तींचा शोध घेतला असता नात्यागात्यातील तर सोडाच गावात किंवा परिसरातही राहत असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ही नाव चढविण्यात कशी आली? असा प्रश्न निर्माण झाला. असे असतानाही मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारीपर्यत ही नावे कमी करण्याची फिर्याद मांडली. मात्र गेल्या चार वर्षांपासून टाळाटाळ केली जात आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार हे उलट शिरजोरी करीत आहेत, कशी नावे कमी होतात? अशी धमकीवजा इशारा महिला तलाठ्यापासून ते तहसिलदारापर्यंत बोलत असून मंडळ अधिकारी हे आपल्या कार्यालयातील एका खासगी व्यक्तीमार्फेत पैशाची मागणी करीत असल्याचेही खळोदे यांनी म्हटले आहे. या प्रकाराने शेतकरी शामराव खळोदे यांनी आपण कंटाळलाे असून येत्या ८ ते १५ दिवसात तिरोडा तहसिल कार्यालयातील महसूल यंत्रणेकडून अन्याय दूर करण्यात आला नाही तर आत्मदहन करण्याचे पाऊल उचलणार? असा इशारा शेतकरी खळोदे यांनी देत आपल्या मृत्यूला महिला तलाठी,मंडळ अधिकारी व तिरोड्याचे तहसिलदार हे सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले.





