तृणधान्यांमधील पोषणतत्वाचे आहारात अनन्यसाधारण महत्व- हिंदुराव चव्हाण

0
15

‘भारत सरकारच्या विकासाची 8 वर्ष व आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष 2023’

मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाचा समारोपीय कार्यक्रम

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचा उपक्रम

       गोंदिया, दि.10 : आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्याचा रोजच्या आहारात समावेश केल्याने आपले शरीर सृदृढ राहण्यात मदत होते. त्यामुळे तृणधान्यांमधील पोषणतत्वाचे आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले.

          माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर, जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहयोगाने जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीत आयोजित ‘भारत सरकारच्या विकासाची 8 वर्ष व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’ या विषयावरील मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाच्या आज समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

           मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे सहायक संचालक हंसराज राऊत, शिक्षणाधिकारी कादर शेख, नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी श्रृती डोंगरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, व बेरार टाईम्स वृत्तपत्राचे संपादक खेमेंद्र कटरे उपस्थित होते.

           पश्चिम महाराष्ट्रात ज्वारी व बाजरीचे पीक मोठ्या प्रामाणात घेत असतात. जिल्ह्यात यावर्षी 500 एकरमध्ये ज्वारीचे पीक घेणयात येणार आहे. आहारातील बाजरीचे तृणधान्यात जास्तीत जास्त ऊर्जा देणारे पीक आहे. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रीत करते. मॅग्नेशिअम व पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत-रक्तदाब नियंत्रीत करण्यास मदत होते तसेच वजन नियंत्रीत करण्यास सुध्दा मदत होते. बाजरीमध्ये सल्फरयुक्त अमिनो आम्ल असल्यामुळे लहान मुले व गर्भवती मातांसाठी उपयुक्त आहे. यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. हृदयास सक्षम बनवते. मधुमेह व कॅन्सर रोधक असते. आपल्या शरिरातील हाडांना मजबुती देण्याचे काम करते. त्यामुळे जिल्ह्यात पौष्टिक तृणधान्य पिकांचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करण्यात यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

          संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाने पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ करणे, तृणधान्यांमधील पोषणमुल्यांमुळे त्यांचे आहारातील अनन्यसाधारण महत्व विचार घेऊन लोकांच्या आहारातील त्यांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने मुल्यवर्धीत उत्पादने तयार करणे अभिप्रेत असल्यामुळे रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करा व निरोगी राहा अशी माहिती यावेळी देण्यात आली.

         सदर प्रदर्शन 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 7 या वेळेत नागरिकांसाठी नि:शुल्क उपलब्ध आहे. या प्रदर्शनात कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, महिला व बाल विकास विभाग आदी विविध विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी उपलब्ध असून जिल्ह्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सदर प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

         यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहिती पत्रिकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

         सदर प्रदर्शनी 8 फेब्रुवारीपासून गोंदिया येथील प्रशासकीय इमारतीत सुरु झाली असून प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. समारोपीय कार्यक्रमात उपस्थितांचे आभार नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी श्रृती डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमास एन.एम.डी.कॉलेजचे विद्यार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.