मुंबई – मंत्रालयात उपसचिवांना केलेल्या मारहाणप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी विधान भवन परिसरात पोलिस तैनात केले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याला ‘म्हाडा’च्या लॉटरीतून घर मिळाले आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला असलेले शासकीय निवासस्थान काढून घेण्याची नोटीस काढण्यात आली होती. या संदर्भात कडू यांनी उपसचिव भा. र. गावित यांना जाब विचारला होता. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव असलेल्या गावित यांनी सरकारी नियमानुसारच कारवाई होत असल्याचे कडू यांना सांगितले होते; पण कडू यांचा पारा चढला आणि त्यांनी गावित यांना मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी लेखनी बंद आंदोलन करून कडू यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.