प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय

0
13

मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) मॉडेलवर उभारण्याचा विचार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी  विधानसभेत सांगितले. गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालये २0१६-१७ च्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबतची लक्षवेधी सूचना काँग्रेसचे गोपाल अग्रवाल यांनी मांडली होती. आधी निर्णय गोंदियाचाच झाला होता, पण गोंदिया खड्डयात गेले आणि चंद्रपूरला एक वर्षाच्या आत हे महाविद्यालय सुरू झाले, हा गोंदियावरील अन्याय सरकार दूर करणार का, असा सवाल त्यांनी केला. गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची परवानगी मिळावी म्हणून आवश्यक ते निकष राज्य शासन तातडीने पूर्ण करेल, गोंदियात महाविद्यालय सुरू करण्याची सरकारची बांधिलकी कायम आहे, असे तावडे यांनी सांगितले.
पीपीपी मॉडेलनुसार उभारण्यात येणार्‍या महाविद्यालय-इस्पितळांमध्ये सरकारी दरानेच उपचार केले जातील, असे तावडे यांनी स्पष्ट केले. तथापि, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पीपीपी मॉडेलवर ही महाविद्यालये उभारण्यास तीव्र विरोध दर्शविला. तसे करणे हे एक प्रकारचे खासगीकरणच असेल, असा इशारा त्यांनी दिला, यावेळी डॉ.देवराव होळी यांनी गडचिरोलीमध्ये निदान आयुर्वेदिक महाविद्यालय उभारावे, अशी मागणी केली, भाजपाचेच जयकुमार रावळ यांनी नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा आग्रह धरला.