
गोंदिया, दि.12 : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र तयार करण्याकरिता सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार यांनी त्यांचे अधिनस्त तालुक्यात विशेष मोहिम राबवून शाळेमध्ये शिबिरांचे आयोजन करावे व जास्तीत जास्त प्रमाणात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र तयार करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिल्या.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात 1 एप्रिल 2023 ते १ मे 2023 या कालावधीमध्ये “सामाजिक न्याय पर्व“ अभियान राबविण्यात येत आहे. सदर कालावधीमध्ये जिल्हयातील इयत्ता १ ली ते 10 वी मध्ये प्रवेशित अनुसुचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मंडणगड पॅटर्न प्रमाणे त्यांच्या विद्यार्थीदशेमध्ये जात प्रमाणपत्र तयार करुन मिळण्याकरिता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 11 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ऑनलाईन आढावा सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सभेला सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, शिक्षणाधिकारी तसेच सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जात प्रमाणपत्र तयार करण्याकरीता रहिवासी दाखला (ग्रामपंचायत/ पोलीस पाटील), आधारकार्ड (लाभार्थी व वडील), प्राथमिक शाळेची टी.सी. (लाभार्थी, वडील व आजोबा) किंवा P1, P2 खसरा इत्यादी दस्ताऐवज आवश्यक असतात अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
तरी जिल्हयातील इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थी व पालक यांनी या सामाजिक न्याय पर्व अभियानामध्ये गोंदिया जिल्हयात तालुकास्तरावर आयोजित शिबिरांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जात प्रमाणपत्र तयार करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.





