35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर धोरणात्मक विचारवंत- प्रा. शैलेंद्र देवळाणकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर धोरणात्मक विचारवंत- प्रा. शैलेंद्र देवळाणकर

0
27

blank

मुंबई, दि. १४ एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विविधांगी पैलू सर्वज्ञात आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान सर्वश्रूत आहे. मात्र एक स्ट्रेटेजिक थिंकर आणि फॉरेन पॉलिसी एक्सपर्ट म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठे योगदान भारताला लाभले आहे. त्यांच्या दृरदृष्टीपणातून आणि धोरणात्मक विचारातून आज भारताच्या सक्षम परराष्ट्र धोरणाची आखणी होत असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण राज्याचे उच्च शिक्षण संचालक प्रा. शैलैंद्र देवळाणकर यांनी नोंदविले. ते आज मुंबई विद्यापीठात महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे परराष्ट्र धोरण’ या विषयावर बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण करमरकर, वित्त व लेखा अधिकारी सी.ए. प्रा. प्रदीप कामथेकर, जयंती सप्ताह समितीच्या निमंत्रक प्रा. मनिषा करने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.

पुढे ते त्यांचे निरीक्षण नोंदवताना प्रा. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले की, शेजारी देशात शांतता आणि स्थैर्य टिकून राहिल्यास ते आपल्या परराष्ट्र धोरणास पुरक ठरत असल्याचे विचार बाबासाहेबांनी त्याकाळी मांडले होते. यावरून त्यांच्यातील द्रष्टेपणा दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या परराष्ट्रीय धोरणाची वेळोवेळी सखोल चिकित्सा केली. १९५६ मध्ये लखनऊ मध्ये बोलताना बाबासाहेबांनी पंडित नेहरूंच्या अलिप्ततावादी चळवळीचे टीकात्मक परीक्षण करून परराष्ट्र धोरण हे कदापी संभ्रम निर्माण करणारे नसावे असे स्पष्ट विचार बाबासाहेबांनी मांडले होते. परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून व भारताला आर्थिक क्षेत्रात आगेकूच करताना अमेरिकेच्या जवळ जाणे किती संयुक्तित आहे, हे त्यांनी त्याकाळी अधोरेखित केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याकाळातील युक्तिवाद आजच्या घडीला तंतोतंत लागू पडत आहे. बाबासाहेबांच्या विचारांना परराष्ट्र धोरणाचा आधार बनवला गेला असता तर आज भारताला युएन सुरक्षा परिषदेचे कायमचे सदस्यत्व बहाल केले गेले असते, असेही त्यांनी नमूद केले. परराष्ट्र धोरण हे भावनिक मुद्यांवर आधारीत नसावे याचे जोरदार समर्थन बाबासाहेबांनी केले होते. चीनच्या विस्तारवादी धोरणाबद्दल  बाबासाहेबांचे विचार खूप स्पष्ट होते. त्यांनी धोक्याची घंटा आधीच ओळखली होती, तशी पूर्वसूचना त्यांनी वेळोवेळी दिली होती. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा प्रा. शैलेंद्र देवळाणकर मुद्दा अधोरेखित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परराष्ट्र धोरणावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांच्या मते, सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक आकांक्षांची पूर्तता करणे हे परराष्ट्र धोरणाचे अंतिम उद्दिष्ट असावे. बासाहेबांनी १९५० मध्येच तसे मत नोंदवून ठेवले.

आज सर्वत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि त्यावर चर्चा घडवून आणली जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार अत्यंत प्रगत आणि द्रष्टेपणाचे होते असे सांगत, बाबासाहेबांनी १९५२ ला, शिक्षणाला कौशल्याची जोड देऊन कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर जोर देण्यात यावा असे विचार  मांडले होते. औद्योगिकीकरणाकडे आगेकूच करत सेवा क्षेत्रातील रोजगारनिर्मितीला येत असलेल्या मर्यादा ओळखून उत्पादन क्षेत्रात पुढे जाण्याचे अत्यंत दृरदृष्टीपणाचे आणि प्रागतिक विचार बाबासाहेबांचे होते असे महत्वाचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. पुढे त्यांच्या निरीक्षणात प्रा. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले की, भारताच्या संरक्षण धोरणाचे लोकशाहीकरण होणे अत्यंत गरजेचे असून आजचे भारताचे आर्थिक, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाबाबातचे अनेक  विचार बाबासाहेबांनी नमूद करून ठेवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्ट्रॅटेजिक थिंकर, परराष्ट्र धोरण विशेषज्ज्ञ म्हणून मान्यता मिळणे गरजेचे आहे. अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण यासंदर्भातील बाबासाहेबांचे विचार मोलाचे आहेत, त्यांच्या या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाच्या विचारावर मौलिक ग्रंथ यावा यासाठी काही शिक्षणतज्ज्ञ पुढाकार घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जयंती सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमातील दुसरे वक्ते ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण करमरकर यांनी ‘भारतीय राज्यघटनेतून व्यक्त झालेले बाबासाहेबांचे द्रष्टेपण’ या विषयावर अत्यंत मौलिक मार्गदर्शन करत भारतीय संविधान निर्मितीचा प्रवास आणि त्याची प्रासंगिकता अधोरेखित करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, बाबासाहेबांनी घटना तयार करताना केवळ तत्कालिन परिस्थितीचा विचार न करता दृरदृष्टीपणातून सर्वसमावेश घटना तयार केली. या घटनेचे बारकाईने निरीक्षण केल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची झेप, औदार्याची परिसिमा, व्यापक विचार आणि काळाची पावले ओळखून बाबासाहेबांनी घटना तयार केल्याचे दिसून येते. बाबासाहेबांचे द्रष्टेपण हे त्यातून अधोरेखित होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही बुद्धाच्या शिकवणीतून घेतली असून, या तीनही तत्वांचा समतोल अंगीकार केल्याशिवाय भारताची लोकशाही तीच्या अपेक्षित दर्जाप्रमाणे यशस्वी होऊ शकणार नाही असेही त्यांनी सांगितले. एकात्म, अखंड, विषमतामूक्त, भेदभावमूक्त अशा प्रकारच्या भारताचे स्वप्न साकार करण्याचे आव्हान आपल्यासमोर असून ते आव्हान पेलण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जयंती सप्ताहाच्या आजच्या या कार्यक्रमासाठी शारिरीक शिक्षण विभागाच्या वतीने लेझिम पथकाचे आयोजन करून विद्यानगरी संकुलात संविधान रॅली काढण्यात आली होती.

blank