36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह बांधकामाचे...

आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन

0
43

अमरावती, दि. 18: नवसारी येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या प्रांगणात शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये ३६० विद्यार्थिनींना राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इमारतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी १५ खोल्या व १ अभ्यासिका राहणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने १३ कोटी ३ लाख ११ हजार रुपये मंजूर केले आहेत.

खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावनकुमार, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या प्र. गृहप्रमुख गायत्री पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

blank

आदिवासी मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. विद्यार्थिनींची डीबीटीची रक्कम वेळेत जमा केली जाईल. शैक्षणिक सुविधेसाठी विद्यार्थिनींना इंटरनेट सुविधा लवकरच पुरविली जाईल. वॉटर कुलर, वॉशिंग मशीन तसेच आवश्यक सर्व सुविधा वसतिगृहात पुरविल्या जातील. विद्यार्थिनींना इयत्ता बारावीपूर्वीच जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. यासाठी संबंधित महाविद्यालयांना सूचित करण्यात येईल. यासाठी सुनिश्चित वेळापत्रकानुसार कार्यक्रम राबविला जाईल. विद्याार्थिंनींना  शैक्षणिक सत्रासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जिथे जिथे वसतिगृहाची गरज आहे, तिथे ते पूर्ण करून देण्यात येईल. जुलैमध्ये याबाबतचा आराखडा पूर्ण होईल. त्यामुळे जिल्ह्यातून आवश्यक प्रस्ताव द्यावेत, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी परतवाडा येथे सांगितले.

परतवाडा येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. एकच्या इमारतीचे लोकार्पण आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते झाले. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चुभाऊ कडू, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, अपर आदिवासी विकास आयुक्त सुरेश वानखडे आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. गावित म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिकताना निवासाची सुविधा असावी म्हणून वसतिगृहे आवश्यक आहेत. त्यामुळे आवश्यक सर्व ठिकाणी वसतिगृह निर्माण करण्यात येतील. आमदार बच्चूभाऊ कडू यांनी अथक प्रयत्न करून या वसतिगृहासाठी जागा मिळवून दिली. त्यामुळे हे वसतिगृह पूर्णत्वास आले आहे. येथे

रस्त्याची सोयही केली जाईल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रे, क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी  प्रकल्प निर्माण करण्यात येईल. घर नसलेल्या आदिवासी बांधवांना घर मिळवून दिले जाईल. येत्या दोन वर्षात सर्वांना घरे दिले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

blank

सैन्यदलातील अग्निवीर, तसेच इतरही स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने वसतिगृहांत मार्गदर्शन केंद्रे विकसित करावीत, तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणही मिळावे, असे खासदार डॉ. बोंडे यांनी सांगितले. मेळघाटातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षकांची भरती असावी जेणेकरून ते आपल्या परिसरातील मुलांना त्यांच्या भाषेत शिकवू शकतील. पर्यायाने शिक्षणाचीही गुणवत्ता वाढेल, असे खासदार श्रीमती राणा यांनी सांगितले.

आमदार श्री. कडू म्हणाले की, अनेक वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत आहेत. हे लक्षात घेऊन कायमस्वरूपी वसतिगृहासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला जागा मिळवण्यात अनेक प्रशासकीय अडथळे आले. ते दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. अखेरीस जागा मिळून काम पूर्ण झाले याचा आनंद आहे. आता शासनाने विभागीय स्तरावरही सर्व सुविधायुक्त वसतिगृहांची निर्मिती करावी. वसतिगृहापर्यंत चांगला रस्ता व वाचनालय व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

blank