
गोंदिया,दि.21: सामाजिक न्याय विभागामार्फत 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत विविध कार्यक्रम घेऊन सामाजिक न्याय पर्व अभियान आयोजित करण्यात येत आहे. त्यानुषंगाने 19 एप्रिल 2023 रोजी मौजा कुडवा ता.जि. गोंदिया येथील मांग-रोडी समाजाच्या शिवाजीनगर वस्तीस भेट देण्यात आली व मांग-गारोडी समाजाच्या “पालावरची शाळा” या उपक्रमाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिली. मांग-गारोडी समाजातील मुलांना इतर मुलांप्रमाणे संस्काराक्षम शिक्षण घेता यावे. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रशांत बोरसे यांनी पालावरची शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांना विविध बाबीचे तांत्रिक ज्ञान मिळावे याकरिता अनुसूचित जाती उपयोजना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत या शाळेला एक लॅपटॉप व प्रोजेक्टर भेट देण्यात आला. यावेळी निर्मला बोरसे पालावरची शाळा, विनोद मोहतुरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गोंदिया, समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे व विद्या मोहोड, कनिष्ठ लिपीक अमेय नाईक, तालुका समन्वयक निवास सहारे व अमीत रंगारी उपस्थित होते.





