
भंडारा-लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडेगाव येथील वनविभागाच्या लाकूड आगाराजवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह संपूर्ण जळालेल्या स्थितीत आढळून आला होता. सात दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेहाची ओळख पटवून त्याचा खून करणार्या दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद तन्वीर अब्दूल रज्जाक शहा (२४) रा. मुद्दलियार ले-आऊट, शांतीनगर नागपूर असे मृतकाचे नाव असून अतिक लातीफ शेख (२९) रा. शांतीनगर नागपूर व फैजन परवेझ खान (१८) रा. विहाड हिंगणा, नागपूर अशी आरोपींची नावे आहेत.
गडेगाव येथील वन विभागाच्या लाकूड आगाराजवळ १३ एप्रिल रोजी जळालेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. लाखनी पोलिसांनी पंचनामा करुन गुन्हा नोंदविला आणि तपासाला सुरुवात केली. या घटनेचा तपास साकोलीचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सुशांत सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलिसांचे विविध पथक तयार करण्यात आले. या पथकाने विदर्भातील सर्व जिल्हे, शेजारील राज्यातील बेपत्ता पुरुषांची माहिती गोळा केली. तपासादरम्यान पोलिस स्टेशन शांतीनगर येथे एका बेपत्ता पुरुषाची नोंद आढळली. त्या अनुषंगाने अधिक तपास केला असता बेपत्ता इसम मोहम्मद तन्वीर अब्दूल रज्जाक शहा हा ६ एप्रिलपासून बेपत्ता असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांकडून माहिती घेण्यात आली. तपासादरम्यान मृतक मोहम्मदचे अतिक शेख आणि फैजन यांच्यासोबत जुना वाद असल्याचे आढळून आल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनीच मोहम्मदचा खून केल्याचे कबूल केले.
आरोपी अतिक याचा मृतक मोहम्मद आणि त्याच्या भावासोबत भांडण झाले होते. त्यामुळे मोहम्मद व त्याचा भाऊ हे अतिक शेख याला मारणार होते. त्यामुळे अतिकने ७ एप्रिल रोजी इंडिका कार क्र . एमएच ४0 डीजी २२८२ ने फिरण्यासाठी निघाला असता गड्डीगोदाम नागपूर येथे मृतक मोहम्मद दिसल्याने त्याने त्याची माफी मागितली आणि फिरण्यासाठी चल म्हणून आग्रह केला. मोहम्मद आणि अतिक हे कारने मिठानीम दर्गा येथे गेले. त्यानंतर आरोपी अतिकने त्याचा भाचा फैजान याला फोन करुन बोलावून घेतले. तिघेही इंडिका कारने दुपारच्या सुमारास भंडाराकडे निघाले. त्यानंतर गडेगाव आगाराजवळील जंगल परिसरातील तलावाजवळ पोहचून कार थांबविली. तिघेही खाली उतरले. त्यांच्यात चर्चा सुरू असताना मोहम्मद याने आरोपी अतिक यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तु माफी माग किंवा काही कर, परंतु, माझा भाऊ तुला मारल्याशिवाय राहणार नाही’, असे बोलून शिवीगाळ केली. तेव्हा आरोपी अतिफ याने फैजान याच्या मदतीने दुपट्टयाने मोहम्मदचा गळा आवळून आणि गळ्यावर चाकुने वार करुन ठार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह कारच्या डिक्कीत टाकले. परंतु, पोलिस आपल्याला पकडतील या भीतीने डिक्कीतून मृतदेह बाहेर काढून जंगलात टाकले व इंडिका कारमधून डिझेल काढून मोहम्मदच्या अंगार टाकून पेटवून दिले. त्यानंतर दोघेही कारने नागपूरला निघाले.
मोहम्मदचा मृतदेह पूर्णत: जळालेला होता. फक्त त्याच्या पॅन्टवर ‘जे.एस.’ असा मार्क दिसून आला. त्यावरुन कुटूंबियांनी त्याची ओळख पटविली. आरोपींची कार नागपूरातून भंडारा व भंडाराकडून नागपूरला गेल्याचे सीसीटीव्हीतून गेल्याचे झाले. पोलिसांनी आरोपींची कार जप्त केली आहे. दोन्ही आरोपींना बुधवारी (ता. १९) अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर, सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहूल देशपांडे, लाखनीचे ठाणेदार मिलींद तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी, नितेश देशमुख, ऋषीकेश चाबुकस्वार, धनराज सेलोकर, माधव परशुरामकर, राजेंद्र कुरुडकर, प्रशांत गुरव, विजय राऊत, कापगते, रामटेके, माळोदे, पुराम, र्शावणकर यांनी केली.





