कीटकजन्य आजार कमी करण्याच्या द्रुष्टिकोनातुन आरोग्य कर्मचार्यांचा होणार सत्कार
गोंदिया,23 एप्रिल -दरवर्षी 25 एप्रिल हा जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यात येतो.त्या दिवसाच्या अनुशंगाने जागतिक आरोग्य संघटनेकडुन एक घोषवाक्य देण्यात येते. जनतेमध्ये हिवताप, डेंग्यू व इतर कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनाची अंमलबजावणी करणे व जनतेच्या सक्रिय सहभाग प्राप्त करून घेणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. कीटकजन्य आजार कमी करण्याच्या द्रुष्टिकोनातुन उत्क्रुष्ट कामे केलेल्या आरोग्य कर्मचार्यांचा ह्या प्रसंगी सत्कार हिवताप विभागाकडुन होणार असल्याची महिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी दिली आहे.ह्या वर्षी दि. 25 एप्रिल जागतिक हिवताप दिवसाच्या अनुशंगाने खालील घोषवाक्य घोषित केलेले आहे.
हिच वेळ खरी, मलेरियाला झिरो करण्याची !
पुरेशा गुंतवणुक करा, कल्पकतेने अंमलात आणा ! ! .
राज्यात गोंदिया जिल्हा हिवताप संबधाने संवेदनशिल जिल्हा आहे. राज्यातील शेवटच्या टोकावरचा जंगलव्याप्त व तलावांचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध आहे. तसेच जिल्ह्याची सिमा मध्यप्रदेश , छत्तीसगडला लागुन आहे. शेजारी चंद्र्पुर व गडचिरोली जिल्हा आहे. वरिल सर्व भागात हिवतापाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.शेजारील सर्व भागातुन मजुर व लोकांचे स्थलांतर गोंदिया जिल्ह्यात होत असते. त्या सोबत लोक हिवतापाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आणत असल्याचे अहवाल आकडेवारी सांगत असते.जिल्ह्यात हिवतापाचा प्रादुर्भाव हा बाराही महिने असतो त्यामुळे कीटकजन्य आजाराचे नियंत्रण करण्याकरिता जिल्ह्यातील जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे. जून पासून (पारेषन काळ) पावसाळा सुरू होत असल्याने कीटकजन्य आजाराचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार गावपातळी पर्यंत योग्य तो प्रतिबंध व नियंत्रणासाठी उपाय योजना सतर्कतेने राबवणे गरजेचे आहे. कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून डास, अळ्या, गप्पी मासे, कीटकनाशके इत्यादी बाबत पोस्टर्स, बॅनर्स च्या माध्यमातुन माहिती नागरिकांना आरोग्य कर्मचारांच्या माध्यमातुन देण्यात येईल.
जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत डास अळी सर्वेक्षण, जलदताप सर्वेक्षण,अॅबेटिंग, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवणे, गप्पी मासे सोडणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना विषयी आरोग्य शिक्षण देणे, गट सभा घेणे इत्यादी कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येतात.तर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्फत रक्त नमुने प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात येतात.
कीटकजन्य आजार नियंत्रणा करिता मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, मच्छरदाणीचा वापर करावा, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व निकामी टायर यांची विल्हेवाट लावावी, कुलर ,फ्रिजच्या ड्रीपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे. पाण्याचा हौद ,टाक्या, रांजण इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे. नाल्या, गटारे वाहती करणे, , ताप आल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेमधुन रक्त तपासून घेणे, कुलरच्या टाकीतील पाणी आठवड्यातून एकदा कोरडे करणे, साचलेल्या पाण्यात डबक्यात जळलेले ऑइल/ रॉकेल सोडणे, डासाला पळवुन लावणार्या साधनांचा वापर करणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे,फुलदाणी मधील पाणी बदलवित जाणे, घराच्या आजुबाजुला असलेले टायर्स, बाटल्या, बादल्या , करवंटे, या मधील पाणी फेकणे अशा विविध उपाययोजना अंमलात करुन किटकजन्य आजार लोकसहभागातुन कमी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी या प्रसंगी केले आहे.
थंडी वाजून ताप येणे, मळमळ होणे, डोके दुखणे, अंगदुखी इत्यादी हिवतापाचे लक्षणे आढळून आल्यास जवळचे आरोग्य संस्थेत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून योग्य तो औषधोपचार करून घ्यावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी केले आहे.





