
अमरावती : सांबराची शिकार केल्यानंतर दोन वाघांमध्ये झालेल्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील वैराट परिसरात उघडकीस आली आहे. या वाघाचे वय ४ ते ५ वर्षे आहे.
चिखलदरा नजीकच्या वैराट वन वर्तुळात काही वन कर्मचारी नियमित गस्तीवर असताना त्यांना पचंबा बिटमध्ये एक वाघ मृत्युमुखी पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सहायक वनसंरक्षक इंद्रजित निकम, चिखलदरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. मयूर भैलुमे, ‘एनटीसीए’चे प्रतिनिधी राकेश महल्ले, अल्केश ठाकरे यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालानुसार वाघाचे सर्व अवयव जागेवर असल्याचे दिसून आले. प्रथम दर्शनी वाघाच्या मानेवर दुसऱ्या वाघाच्या दाताने चावा घेतल्याच्या खुणा आढळून आल्या, त्याच्या शरीरावरदेखील दुसऱ्या वाघाचे ओरखडे दिसून आले.पशुवैद्यक यांच्या तपासणीनुसार प्रथम दर्शनी दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. या बाबतीत अधिक तपास सुरू असून आजूबाजूच्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे. पाणवठ्याचीदेखील तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली