अमरावती : देशी कट्टा बाळगून दुचाकीने फिरणाऱ्या दोघांना फ्रेजरपुरा पोलिसांनी विद्यापीठ चौक परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. संघर्ष रवींद्र फुले (२९) रा. वडाळी व यशकुमार भाऊराव गोसावी (३४) रा. बडनेरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दोन तरुण देशी कट्टा बाळगून राजुरा नाका ते विद्यापीठ चौक मार्गावर दुचाकीने फिरून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी राजुरा नाका ते विद्यापीठ चौक मार्गावर सापळा रचून दुचाकीस्वार संघर्ष फुले व यशकुमार गोसावी यांना पकडले. अंगझडतीदरम्यान यशकुमार याच्याजवळ देशी कट्टा व मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतूस आढळून आले.पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून दुचाकी क्रमांक एमएच २७ सीएच २०५१, देशी कट्टा व दोन काडतूस असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई फ्रेजरपुराचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आकाश वाठोरे, सुनील सोळंके, महेंद्र वलके, सागर पंडित, शेखर गायकवाड यांनी केली.