
गोंदिया,दि.28-तिरोडा येथून दहा किलोमीटर दूर सरांडी येथील खेमराज साठवणे यांच्या घरगुती विहिरीतील सबमर्सिबल मोटार पंप बंद पडला. तो दुरुस्त करण्याकरिता खेमराज साठवणे (४६) विहिरीत उतरले. परंतु बराच वेळ होऊन सुद्धा ते बाहेर आले नाही म्हणून सचिन भोंगाडे (२५) खाली उतरला. तो खाली पडल्याचे पाहुन त्यांना वाचविण्याकरिता प्रकाश भोंगाडे (४७) व महेंद्र राऊत (३१) देखील उतरले. परंतु ते देखील खाली पडले. त्यांना वाचवण्यासाठी पाचवी व्यक्ती लक्ष्मण लिल्हारे विहिरीत उतरले पण त्यांचा श्वास गुदमरत आहे हे लक्षात येताच ते परत वर आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
पाण्याच्या मोटर मधील इलेक्ट्रिक शॉक मुळे ते पडले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र विहिरीत पावसाळ्यात मुळें विषारी वायू निर्माण झाला असावा. कोंबडीचा पिल्लू दोरीने बांधून विहिरीत सोडला असता तो देखील मरण पावला. त्यामुळे ते सर्व देखील श्वास गुदमरून खाली विहिरीत पडले असावेत, अशी चर्चा आहे. खरे कारण पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कडू शकेल . प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्य पूर्ण केले. मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात तिरोडा येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली.
माजी आमदार दिलीप बन्सोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पिटु रहांगडाले, जि. प. सदस्या रजनी कुंभरे, कृउबास संचालक रामसागर धावडे, प्रशासनाकडून तहसीलदार गजानन कोकुडे, गटविकास अधिकारी लिल्हारे, विद्युत विभागाचे अधिकारी, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे, पोलिस निरीक्षक देवीदास कठाडे मदत कार्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित होते.






