
गोंदिया,दि.02- राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोठा धक्का देताना आज 2 जुर्ले रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहे. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांचाच विक्रम त्यांनी मोडला आहे.तर एकाच पंंचवार्षिकमध्ये तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाचा शपथ घेतली.
पहिल्यांदा
अजित पवार यांनी 11 नोव्हेंबर 2010 रोजी सर्वप्रमथ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तब्बल 1 वर्ष 319 दिवस या पदावर राहिल्यानंतर 25 सप्टेंबर 2012 रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते.
दुसऱ्यांदा
यानंतर तीनच महिन्यांत पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वात 7 डिसेंबर 2012 रोजी अजित पवार यांनी पुन्हा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ते या पदावर कायम राहिले. एकाच पंचवार्षिकमध्ये दोन वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
तिसऱ्यांदा
अजित पवार यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ती 23 नोव्हेंबर 2019 रोजी. त्यांचा हा शपथविधी संपूर्ण देशभरात चांगलाच चर्चेत राहिला. सकाळीच घेतलेल्या या शपथेला पहाटेचा शपथविधी म्हणून संबोधले गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वात तीन दिवसांसाठी अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दर्शवल्याने अजित पवार यांचे हे बंड तीनच दिवसांत फोल ठरले.
चौथ्यांदा
देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग फसल्यानंतर अजित पवारही पुन्हा महाविकास आघाडीसोबत आले आणि पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. 30 डिसेंबर 2019 रोजी अजित पवार यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळेपर्यंत 2 वर्षे 181 दिवसांसाठी ते या पदावर कायम राहिले.
पाचव्यांदा
आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी आज म्हणजेच 2 जुलै 2023 रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते पाचव्यांदा या पदावर विराजमान झाले आहे. विशेष म्हणजे एकाच पंचवार्षिकमधील हे त्यांचे तिसरे उपमुख्यमंत्रीपद आहे.





