
75 वा वाढदिवस उत्साहात साजरा
संगीतमय मैफलने कार्यक्रमात आली रंगत
50 मैत्र आप्त स्वकीयांचा सत्कार
लाखनी ता.19 जुलै :-तरुण पिढीचा सामाजिक प्रवास आता सेवा निवृत होऊ लागला असून समाजात चेतना निर्माण करण्याचे काम सेवानिवृत्त म्हातारी मंडळी करू लागली आहे. आयु.गजेंद्र गजभिये सरांचे मोठं योगदान असून त्यांच्या कार्यप्रणालितून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी असे आवाहन प्रा.सुरेश खोब्रागडे यांनी (ता.18) केले.
लाखनी येथील महा प्रज्ञा बुद्ध विहारात आयोजित आयु. गजेंद्र गजभिये यांचा 75 वा वाढदिवस कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव झोडापे हे होते. मंचावर पूज्य भन्ते भदंत महाथेरो, बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयु.बनसोड, गोंदियाचे किसन डोंगरे, सेवा निवृत मुख्याध्यापक आत्माराम वासनिक, काशीराम जनबंधू,समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. कोचे आणि सत्कारमूर्ती गजेंद्र गजभिये आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रा. खोब्रागडे पुढे बोलताना म्हणाले की, गजभिये सरांवर प्रेम करणाऱ्या माणसांचा मोठा जनसमुदाय आहे. कार्यकर्ता कसा असावा याची जाणीव त्यांच्या कार्यातून होते. कारण नव्या पिढीला उभारी देण्याचं काम त्यांनी केलं आहे.त्यांनी त्यांच्या साध्या जीवनाची तोंड भरून प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले की आजच्या या भव्य कार्यक्रमामुळे त्यांची 10 वर्षे वाढणार असून त्यांनी शंभराहून अधिक वर्ष गाठावं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज ज्या ज्या आप्त स्वकीय मित्र मंडळीचा सत्कार होणार आहे त्यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी देण्यात येत आहे, असा मानस त्यांनी बोलून दाखविला.
याप्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवराने आपले विचार मांडले.तथागत भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याना माल्यार्पण करून आणि बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.संगीतमय स्वागतगीताने पाहुण्यांचं स्वागत झालं.सत्कारमूर्ती गजेंद्र गजभिये यांचे नातू पार्थ गजभिये यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करणारे संगित सादर केलं!
प्रास्ताविक सत्कार्मुर्ती सेवा निवृत्त प्राचार्य गजेंद्र गजभिये यांनी केले.संचालन छोटे बंधू शिक्षक सुरेश गजभिये यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने आप्त स्वकीय, मित्र मंडळी उपस्थित होते.
पारिवारिक घानिष्टता आणि कुटुंबात स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा, त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करण्याचे उद्दिष्ठ ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मातृपितृ गजभिये प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.





