
. १७ ऑगस्टला दिव्यांग शिबिर
. विविध योजनांचा लाभ मिळणार
. अध्यक्ष बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन
. पूर्व तयारीचा आढावा
गोंदिया, दि.14 : ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाअंतर्गत १७ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मरारटोली, गोंदिया येथे जिल्हास्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना देण्यात येणार आहे. दिव्यांग कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी यासह विविध साहित्याचे वाटप या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. या अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शन आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबीर होणार आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय गणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानांतर्गत विविध विभागांमार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचावी तसेच योजनांचा लाभ दिव्यांगांना एकाच ठिकाणी मिळावा यासाठी जिल्हास्तरीय शिबीराचे आयोजन १७ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मरारटोली, गोंदिया येथे करण्यात आलेले आहे. या एक दिवसीय शिबिरामध्ये आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू हे स्वतः उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता करण्याचे आयोजिले आहे.
दिव्यांग व्यक्तीच्या विकासासाठी ‘शासन आपल्या दारी’ या धर्तीवर ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान असून या कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्यात यावा. इतर विभागाने सुद्धा शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा. या निमित्ताने लाभार्थ्यांकडून योजनांचे अर्ज भरून घ्यावेत. त्यांना योजनांची व्यवस्थित माहिती द्यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींची अजिबात गैरसोय होणार नाही याची प्रत्येक विभागाने दक्षता घ्यावी असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
सदर अभियानामध्ये प्रत्येक विभागास स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामध्ये विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती व प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार असून पात्र दिव्यांग लाभाथ्यांचे अर्ज त्याच ठिकाणी भरुन घेण्यात येणार आहे. त्याकरिता शिबिरामध्ये येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्र (UDID प्रमाणपत्र), आधार कार्ड, आयु संबंधी प्रमाणपत्र (जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला), पासपोर्ट फोटो ०३, उत्पन्नाचा दाखला (Income certificate) इत्यादी आवश्यक दाखले मुळ प्रमाणपत्रांसह सोबत घेवून यावे व जास्तीत जास्त दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.





