
■ आठ आरोपी पसार .
■ देवरी येथील अग्रसेन चौकातील घटना.
■ आरोपींचा शोध सुरु.
देवरी,दि.२५: : शहरातील अग्रसेन चौकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून त्याच्या जवळील ८ हजार ३०० रुपये लुटल्याची घटना बुधवारी (दि २३आगस्ट) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणातील आठ आरोपी फरार असून, त्यांचा शोध देवरी पोलिस घेत आहेत.
सविस्तर असे की, अमरावतीवरून देवरी येथे व्यापाऱ्यांचे खत घेऊन आलेला ट्रक क्रमांक एमएच २६, डीई ७९०६ हा सायंकाळी ६ वाजेपासून अग्रसेन चौकात उभा करून ट्र्कचालक फिरोजखा गुलाम हुसेन खान (३८) हा रात्री १० वाजता जेवण करीत होता. ट्रकमध्ये पिण्याचे पाणी नसल्याने त्याने आपल्या भावाला पाणी आणण्यासाठी हॉटेलमध्ये पाठविले. . दरम्यान, तोंडावर काळा रुमाल बांधलेले चार अज्ञात युवक हे ट्रकमध्ये शिरले. या आरोपींनी चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकास तुझ्याजवळ किती पैसे आहेत, ते दे नाहीतर तुझा मर्डर करू, असे धमकावले. ट्रकचालकाने आपल्याजवळील २,८०० रुपये त्या अज्ञात युवकांना दिले, तर दुसऱ्या चार युवकांनी त्याच्याजवळील ट्रकची चावी हिसकावली व ट्रक चालवीत देवरीवरून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भर्रेगाव फाट्याजवळून त्यांनी ट्रक देवरीच्या दिशेने वळवून थांबविला. आणि त्यांनी चालकास आपल्या भावाला फोन करण्यास लावले. तर चालकाने त्याचा भाऊ जो देवरीमध्ये उभा होता, त्याला फोन केला. तुझ्याजवळ आलेल्या व्यक्तींना तुझ्या जवळचे पैसे देऊन टाक, नाहीतर हे मला मारून टाकतील, असे सांगितले. या चोरट्यांचे दुसऱ्या चार साथीदारांनी चालकाचा भाऊ नदीम खान जो देवरीला उभा होता त्याला धमकावून त्याच्याजवळून पाच हजार पाचशे रुपये हिसकावून नेले. नंतर ते चारही जण पांढऱ्या रंगाच्या कारने ट्रकजवळ आले व आपल्या साथीदारांना घेऊन देवरीच्या दिशेने पसार झाले.





