
बुलढाणा : खामगाव शहरात ‘ऑनलाइन’ पद्धतीने चालणाऱ्या देहविक्रीचा गोरखधंदा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. एका अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या या धंद्यांची सूत्रधार एक महिला आहे, हे विशेष.
खामगावात ३७ वर्षांच्या महिलेने जलंब नाका परिसरातील अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला. राहण्यासाठी घेतलेल्या या सदनिकेत तिने वेगळाच धंदा सुरू केला. हलाखीची स्थिती असलेल्या महिलांना हेरायचे आणि देहविक्रीसाठी त्यांचा वापर करून घ्यायचा. भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये हा काळा धंदा चालायचा. गोरगरीब महिलांच्या असहायतेचा फायदा घेत त्यांच्याकडून फ्लॅटमध्ये देहविक्री करून घेत पैसा कमावत होती. पुरुष वासनेची भूक भागवण्यासाठी पैसे मोजून त्या फ्लॅटवर जायचे. सध्याचा ऑनलाईनचा जमाना ओळखून महिलेने पैसे स्वीकारण्यासाठी ‘क्युआर कोड’ची तजवीज केली होती.
खामगाव शहर पोलीस ठाण्याचे नूतन ठाणेदार नरेंद्र ठाकरेंना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी आधी एक डमी ग्राहक पाठवून माहितीची खात्री केली आणि मग सुनियोजितपणे छापा टाकला. यावेळी दोन ग्राहक ‘ऑनलाईन’ होते. पोलिसांनी आरोपी भाडेकरू महिलेच्या ताब्यातून दोन मोबाईल, रोख ७३९० रुपये, क्युआर कोडसह इतर वस्तू, असा २४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ऐन कारवाईत तिथे आलेल्या दोन ग्राहक तरुणांकडून दोन मोबाईल व प्रत्येक ५ हजार रोख असा १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका पीडित महिलेचे वय ३६ तर दुसरीचे वय ५० आहे.





