41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता धान कापणीसाठी मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले; १८ जखमी

धान कापणीसाठी मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले; १८ जखमी

0
50

blank

भंडारा : धान कापणीसाठी महिला मजूर घेऊन जांभोऱ्याहून मोहाडीकडे जाणारी टाटा सुमो गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात असंतुलित होऊन उलटल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज गावाजवळ घडली. या अपघातात चालकासह दोन महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. १८ जण किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सध्या सर्वत्र धान कापणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग सकाळच्या सुमारास धान कापणीच्या कामासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला किंवा जिल्ह्याबाहेरसुद्धा जात आहेत. मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील जवळपास १८ महिला आणि २ पुरुष असे २० मजूर आज सकाळी मोहाडी येथे धान कापणीच्या कामासाठी निघाले. हे सगळे एका टाटा सुमो गाडीत बसले. साडेदहा वाजताच्या सुमारास गाडी मुंढरी बुज गावाजवळ पोहोचली असताना समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाने वेग वाढविला. मात्र गाडी असंतुलित झाल्याने उलटली.
चालकासह दोन महिला मजूर गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. जखमींना बाहेर काढले. नंतर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गायकवाड पुढील तपास करीत आहे.

blank