यवतमाळ:- यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पत्नीच्या चारित्र्यावरील संशयाने जावयाने धारदार शस्त्राने पत्नी, दोन मेहुणे आणि सासऱ्यावर वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. जावयाने सासूवर देखील हल्ला केला असून यात सासू गंभीर जखमी झाली आहे.
गोविंद विरचंद पवार असे आरोपी जावयाचे नाव आहे. तर पत्नी रेखा गोविंद पवार, सासरा पंडित भोसले, मेहुणा ज्ञानेश्वर भोसले आणि सुनील भोसले असे खून झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्या येथे गोविंद पवार हा त्याच्या पत्नी सोबत राहत होता. दरम्यान, तो पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. यामुळे दोघात मोठे वाद होत होते. गोविंद हा पत्नी रेखाला मारहाण करत होता. रेखा गोविंदच्या मारहाणीला कंटाळून तिच्या माहेरी निघून गेली होती.
दरम्यान, तिने पुन्हा घरी यावे यासाठी गोविंद सासरच्यांसोबत वाद घालत होता. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास गोविंद हा पत्नी रेखा हीच्या माहेरी गेला. या ठिकाणी वाद झाल्याने त्याने रागाच्या भरात सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने हल्ला केला. यात पत्नी, दोन मेहुणे आणि सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर सासू रुखमा घोसले या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी आले असून त्यांनी पाहणी केली. पोलिसांनी आरोपी जावई गोविंद विरचंद पवार याला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेमुळे मात्र, संपूर्ण जिल्हा हादरला आहे.