
पवनी येथे संत चोखामेळा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न
पवनी: सर्व जातींना सोबत घेऊन चालणारा संप्रदाय म्हणजे ज्ञानोबांनी सुरू केलेला वारकरी संप्रदाय. सामाजिक समरसतेचे सक्रिय दर्शन कुठे दिसत असेल तर ते संत परंपरेमध्ये. चोखोबा संत वारीतले फार मोठे संत, ज्ञानोबारायांचा जो अधिकार तोच अधिकार वारी मधला चोखोबांचा. त्या चोखोबांच्या नावाने हे विद्यालय चालते, त्यांच्या नावाने पुरस्कार दिल्या जातो ही फार मोठी अभिमानाची गोष्ट, असे प्रतिपादन रामायणाचार्य ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांनी केले. संत चोखामेळा गौरव पुरस्कार सोहळा येथे प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.
श्री संत चोखामेळा शिक्षण संस्था व सामाजिक समरसता मंच भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने गत तीन वर्षापासून श्री संत चोखामेळा गौरव पुरस्कार सोहळा घेण्यात येतो. संत चोखामेळा यांच्या नावाने चालणारी महाराष्ट्रातील एकमेव शिक्षण संस्था आपल्या पवनी मध्ये आहे, ही अत्यंत गौरवाची बाब आहे, असे मनोगत यावेळी उपस्थित अतिथिंनी व्यक्त केले. संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमातील एक भाग म्हणजे श्री संत चोखामेळा गौरव पुरस्कार.
संत चोखामेळा शिक्षण संस्थेची सामाजिक बांधिलकी म्हणून भंडारा जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभूतींचा गौरव या सोहळ्यात करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार पवनी नगरातील डॉ. गुरुचरण नंदागवळी, तुमसर तालुक्यातील डॉ. सुखदेवराव अडकणे, भंडारा नगरातील डॉ. सौ. सुचिताताई वाघमारे यांना सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल, लाखांदूर तालुक्यातील सौ. वृषालीताई रामटेके महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला एसटी चालक, पवनी तालुक्यातील अरविंद शिवदास धारगावे यांना बिकट परिस्थतीतून पुढे येत शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती केल्याबद्दल, भंडारा तालुक्यातील अमित हुमणे यांना मुला-मुलींना लाठी-काठी व आत्मरक्षेचे धडे दिल्याबद्दल, पालांदुरचे उपसरपंच पंकज रामटेके यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल, लाखनी तालुक्यातील मंगेश मेश्राम सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बुलढाणा येथील प्रसिद्ध रामायणाचार्य ह. भ. प. संजय महाराज पाचपोर लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुभाष लोहे संयोजक भारतीय विचार मंच विदर्भ प्रांत, विशेष अतिथी श्री चंद्रकांतजी उके माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मेंढे यांनी केले, सूत्रसंचालन राहुल बावणे संयोजक सामाजिक समरसता मंच तसेच विवेक जुमळे यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मनोज माळवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संत चोखामेळा शिक्षण संस्थेच्या सर्व सदस्यांनी, सामाजिक समरसता मंच भंडारा व बालाजी विद्यानिकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा दिघोरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले.