‘तो’ बॉम्ब नसून केवळ अग्निशमन यंत्र!

0
20

नागपूर : गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर गडचिरोलीतून आलेल्या एका बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक-नाशक पथकाने बॉम्बसदृष्य वस्तू ताब्यात घेतली. सुराबर्डी येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, डेपो व्यवस्थापकाने चालकाला फोन करून माहिती घेतली असता ती वस्तू बॉम्ब नसून केवळ आग विझविण्याचे लहान आकाराचे अग्निशमन यंत्र (फायर इंस्टींग्युटर) असल्याचे सांगितले. त्यामुळे बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथक, दहशतवाद विरोधी पथक, गुप्तचर यंत्रणा आणि गणेशपेठ पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बुटीबोरी जवळील रिधोरी येथे बस ब्रेक डाऊन झाल्याची माहीती डेपो व्यवस्थापक गौतम शेंडे यांना मिळाली. तांत्रिक कर्मचारी नितीन राऊत सामानासह गडचिरोली डेपोच्या बसने (एमएच-४०-वाय-५०९७) घटनास्थळी पोहोचले. काम आटोपल्यानंतर ११.४० वाजता गणेशपेठ स्थानकावर बस घेऊन आले. बस थांबवून खाली उतरत असताना त्यांना केबिनमध्येच डोमच्या आकारातील आणि फिल्टरसारखी एक वस्तू दिसली. डेपो व्यवस्थापक शेंडे यांनी गणेशपेठ पोलिसांना कळविले.

काही वेळातच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. बीडीडीएस आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. दहशतवादी विरोधी पथक, गुप्तचर यंत्रणाही पोहोचली. संपूर्ण परिसरत रिकामा करण्यात आला. दरम्यान पोलिस उपायुक्त गोरख भामरे, उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या उपस्थितीत बसमधून ती वस्तू काढून तपासासाठी सूराबर्डी येथे पाठविण्यात आली. दरम्यान, त्या बसच्या चालकाशी पोलिसांनी संपर्क केला. त्याला बॉम्बसदृष्य वस्तूबाबत विचारणा केली. ‘तो बॉम्ब नसून केवळ आग विझविण्याचे लहान आकाराचे अग्निशमन यंत्र (फायर इंस्टींग्युटर) आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यातील रेडमॅटिक कंपनीने गडचिरोली आगारातील जवळपास सर्वच बसमध्ये ते यंत्र दिले आहे. बसमध्ये अचानक आग लागल्यानंतर त्या यंत्राचा ताबडतोब वापर करता यावा, यासाठी चालकाच्या कॅबिनमध्ये ठेवण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी खात्री पटली.