आदेश १२ तासाचे मात्र वीजपुरवठा होतो केवळ ८ तासच

0
29

▪ राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनाचा शरद पवार गटाचा इशारा
गोंदिया :जंगलव्याप्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत तसे पत्रही काढले आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना केवळ ८ तासच वीजपुरवठा देत असल्याने शेतकरी शासन प्रशासना विरोधात चांगलेच संतापले आहेत. तर शरद पवार गटाने शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा येथे चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सविस्तर असे की, गोंदिया हा जंगलव्याप्त जिल्हा आहे. या जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतीवर अवलंबून असून शेतात लागवडीखालील पिकांना सिंचनासाठी कृषी विज पंपाची सुविधा ऊपलब्ध आहे. कृषी वीज पंपांना रात्रीचे प्रहरी वीजपुरवठा होत असल्याने कित्येक शेतकरी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात दगावले असल्याच्या ही घटना घडल्या होत्या.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्यासाठी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी आमरण उपोषण पुकारले होते. या उपोषणाची दखल घेत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास विजापुरवठा करण्याचे आदेश निर्गमित झाले होते. त्यानुसार काही दिवस दिवसा १२ तास वीजपुरवठा झाला. मात्र या घटनेला महिनाही लोटत नाही तोच केवळ ८ तास वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांत शासन प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, कृषी वीज पंपांना दिवसा १२ ऐवजी ८ तास वीजपुरवठा होत असल्याने शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी पुन्हा एकदा शासन प्रशासनाला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा येथे चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांविरोधात शेतकऱ्यांत संताप
शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश निर्गमित होताच जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी श्रेय लाटण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला होता. या नेत्यांनी सोशल मीडियासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनरबाजी केल्याने श्रेयवादाची लढाई पेटली होती. पुन्हा एकदा श्रेय वाद लाटण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी १२ वरून ८ तास वीजपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडल्याचे शेतकऱ्यांत बोलले जात असून जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांविरोधात शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.