गोंदिया, दि.17 : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा आवश्यक असल्याने सर्व यंत्रणांनी यासाठी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील इयत्ता १० वी /१२ वी परीक्षा केंद्र संचालक, परिरक्षक यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावर्षी परीक्षा पारदर्शी व निर्भय वातावरणात होण्यासाठी मागील वर्षभरापासून सातत्याने सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी तत्परतेने व कर्तव्य कठोरपणे अंमलबजावणी करावी असेही ते म्हणाले. परीक्षेतील गैरप्रकारांना खतपाणी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना अनेक उदाहरणे देऊन प्रभावी मार्गदर्शन केले. कॉपी म्हणजे शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान यशस्वी करावे. विद्यार्थी व पालक यांना विश्वासात घेऊन परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
सुरुवातीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख यांनी या दोन्ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डायटचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत, उपशिक्षणाधिकारी श्री. दिघोरे, सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.