35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता सडक अर्जुनी नगराध्यक्ष मडावी,प्र.मुख्याधिकारी हलमारेसह इतर ४ जण लाच घेताना जाळ्यात

सडक अर्जुनी नगराध्यक्ष मडावी,प्र.मुख्याधिकारी हलमारेसह इतर ४ जण लाच घेताना जाळ्यात

0
397

blank

बांधकाम सभापती अंबादेसह नगरसेवक रंगारीसह इतर दोघेही जाळ्यात

गोंदिया दि.१४: सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या वैशिष्ट्य पुर्ण कामासाठी विशेष अनुदानातून तयार करण्यात आलेल्या बांधकामाच्या निविदेच्या रक्कमेवर १५ टक्के कमीशनची मागणी करुन त्या १५ टक्के कमीशनची रक्कम स्विकारल्याने जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तेजराम मडावीसह,नायब तहसिलदार व प्रभारी मुख्याधिकारी शरद हलमारे,बांधकाम सभापती अश्लेष अंबादे,नगरसेवक महेंद्र रंगारी व नगरसेविकेचे पती खासगी ईसम जुबेर अलीम शेख @ राजू शेख व खासगी इसम शुभम रामकृष्ण येरणे यांना १ लाख ८२ हजाराची लाच घेतल्याप्ररकरणात एसीबीने आज(दि.१४)सापळा रचून अटक केली.

सविस्तर असे की,तक्रारदाराचा मुलगा कंत्राटदार असून सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या वैशिष्ट्य पुर्ण कामासाठी विशेष अनुदान सन 2023-24 लेखाशिर्ष (2217 1301) या योजने अंतर्गत दोन नाली बांधकामाच्या ई निविदा मंजूर झाल्या होत्या.त्या कामाच्या निविदेपोटी तक्रारदार यांनी सुरक्षा रक्कम भरली.व कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता तक्रारदाराने मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता नगराध्यक्ष तेजराम मडावी यांनी निविदा रकमेच्या १५% रक्कम लाचेची मागणी केली.मात्र तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार(दि.१३) केली होती.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदाराने कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता मुख्याधिकारी यांची भेट घेतली.त्यावर प्रभारी मुख्याधिकारी हलमारे यांनी नगराध्यक्ष मडावी यांची भेट घेण्यास सांगितले.त्यामुळे तक्रारदाराने नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता लोकसेवक असलेले नगराध्यक्ष तेजराम मडावी यांनी निविदा रक्कम रू १२,१५,६३४/-रक्कमेवर १५% टक्के प्रमाणे रू १,८२,०००/- लाच रकमेची पंचासमक्ष मागणी केली.तसेच मुख्याधिकारी,बांधकाम सभापती,नगरसेवक,नगरसेवक यांचे पती व एका खासगी इसमाने त्या लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिले.तसेच नगराध्यक्ष मडावी यांनी लाच रक्कम खासगी इसम असलेले शुभम रामकृष्ण येरणे यांच्या दुकानात देण्यास सांगितल्याने तक्रारदाराने खासगी इसम असलेले शुभम येरणे यांच्या दुकानात रक्कम दिली असता ती लाच रक्कम स्विकारल्याने लाचलुचपत विभागाने आरोपीस लाच रकमेसह ताब्यात घेतले.आरोपी क्रं, १,२,३,४ व ६ यांना ताब्यात घेण्यात आले असून पो. स्टे. डुग्गीपार येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सदर कारवाई गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षक अधिकारी व पोलीस उप अधिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला.या सापळा कार्यवाही पथकात पो.नि. उमाकांत उगले.स.फौ.चंद्रकांत करपे,पो. हवा. संजयकुमार बोहरे,मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, मनापोशी संगीता पटले ,चालक नापोशि दिपक बाटबर्वे सहभागी झाले होते.

blank