गोंदिया : जिल्हा पोलीस प्रशासनाकडून माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्याकरीता केलेले आवाहन आणि माओवाद्यांचे संघटनेच्या अत्याचाराला कंटाळून माओवादी संघटनेत सक्रिय सहभाग असलेल्या प्लाटून पार्टी कमिटी मेंबर जहाल माओवाद्याने 3 जून रोजी गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले. संजय उर्फ बिच्छेम पूनेम (वय 25 रा. पुसनार, ता. गंगालूर, जि. बिजापूर (, छ. ग.) असे आत्मसमर्पित नक्षल्याचे नाव असून त्याचेवर शासनाने 7 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत “नक्षल आत्मसमर्पण योजना” राबविली जात आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता जिल्ह्यात प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत असून विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनतेला, नागरिकांना माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच जे माओवादी विविध भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.आवाहनाला प्रतिसाद देत संजय उर्फ बिच्छेम पूनेम याने आत्मसमर्पण केले. अशी माहिती आज, (ता. 19) जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ठ होवून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेवुन आपले जीवन सुकर करण्याचे आवाहन केले आहे.आत्मसमर्पित माओवादी संजय उर्फ बीच्चेम याने ऑक्टोंबर 2013 मध्ये गंगालुर दलम मध्ये भरती होऊन माड एरिया मध्ये कंपनी क्र. 7 व 10 मध्ये जहाल माओवादी पहाडसिंग याचा अंगरक्षक म्हणून काम सांभाळले, तसेच दर्रेकसा एरिया कमिटी, प्लॉटून -1, व (सी.एन. एम.) चेतना नाट्य मंच मध्ये काम केले आहे. त्याचबरोबर सन 2017-18 मध्ये प्लॉटून-1 मध्ये कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत मुरकुटडोह, टेकाटोला, तसेच चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत कोसबी जंगल परिसरात घडलेल्या नक्षल पोलीस चकमकीत सक्रीय सहभाग घेवून चकमक घडवून आणली आहे.