३० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडल
महागाव–रखडलेल्या पाणंद रस्त्याचे काम मार्गी लावून देण्यासाठी गरीब शेतकऱ्याला ३० हजार रुपयांची लाच मागणारा महागाव तहसील कार्यालयातील लाचखोर महसूल सहायक आज अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. प्रवीण कुमार महादेव पोहरकर असे या भ्रष्ट कर्मचाऱ्याचे नाव आहे. महागाव तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक या पदावर तो कार्यरत आहे. यवतमाळ येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज बुधवारी (ता.२६) सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान तहसील कार्यालयात ही कारवाई केली. एसीबीच्या या कारवाईमुळे तहसील प्रशासनातील भ्रष्ट आणि लाचखोर चाकरमान्यांचे धाबे दणाणले आहेत. पांडुरंग सखाराम आंडगे असे तक्रारदार शेतकऱ्याचे नाव आहे. ते हिवरा येथे राहतात. पांडुरंग आंडगे यांची हिवरा गावाला लागून १ हेक्टर ४१ आर शेती आहे. हिवरा जिनिंग फॅक्टरीला लागून असलेला पाणंद रस्ता हा शेताकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. हा पाणंद रस्ता अतिक्रमणाने गिळला असून शेतात जाण्यास वाटच राहिली नाही. पाणंद रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी पांडुरंग आंडगे मार्च २०२१ पासून सरकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. यापुर्वी त्यांनी महागाव तहसील कार्यालयासमोर तब्बल तीन वेळा उपोषणही केले व आजवर शेकडो निवेदने दिले. संवेदनशुन्य शासन आणि प्रशासन दखल घेत नसल्यामुळे या अन्यायग्रस्त शेतकऱ्याने यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. याउपरही कुठलाच तोडगा न निघाल्यामुळे पांडुरंग आंडगे यांनी हिवरा येथे टॉवर वर चढून विरुगीरी करीत पुन्हा एकदा आंदोलन केले होते. तरीही या शेतकऱ्याची तक्रार बेदखलच राहिली आहे. महागाव तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागात या शेतकऱ्याच्या पाणंद रस्त्याचा प्रश्न लाल फितीत अडकून पडला आहे. तहसील कार्यालयातील फाईल क्लिअर करण्यासाठी कनिष्ठ लिपिक प्रवीणकुमार पोहरकर याने शेतकऱ्यास ४० हजाराची लाच मागीतली. तडजोडी अंती ३० हजार रुपये घेण्यास तो राजी झाला होता. पाणंद रस्त्यासाठी वैतागलेल्या शेतकऱ्याने या प्रकरणाची तक्रार एसीबी कडे केली, त्यानंतर एसीबीच्या पथकाने आज तहसील कार्यालयात सापळा लावला. कार्यालयाची शासकीय वेळ संपत आल्यानंतर लाचखोर लिपिकाला तहसिल कार्यालयातच ३० हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. त्यानंतर चौकशी साठी त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात नेण्यात आले. पोहरकर यांने शेतकऱ्याला स्वतः लाच मागितली की, यात आणखी कोणी वरिष्ठ अधिकारी सहभागी आहे याची चौकशी केली जात आहे. ही कारवाई
एसीबीचे पोलीस अधीक्षक मारोती जगताप,अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात, पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे, जयंत ब्राम्हणकर, सचिन भोयर,राकेश सावसाकडे, सचिन सोनवणे,सुरज मेश्राम, भागवत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे यांनी केली.
पोहरकर याने चार पत्रकारांवर केला होता खंडणीचा गुन्हा
३० हजाराची लाच घेताना सापळ्यात अडकलेल्या प्रविणकुमार पोहरकर याने तीन महिन्यापुर्वी महागावातील चार पत्रकारांवर खंडणी मागीतल्याची तक्रार देऊन त्यांना अटक करण्यास भाग पाडले होते. साळसुदपणाचा आव आणणारा हा लाचखोर आज स्वतःच एसीबीच्या कारवाईत अडकला.