
यवतमाळ दि.१— रेती भरून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतकांमध्ये दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश असून सर्व जण पंजाब राज्यातील असून नांदेड येथे गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जात होते.ही घटना आज सोमवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान यवतमाळ -नागपूर मार्गावर कळंब जवळ असलेल्या चापर्डा गावाजवळ घडली . कन्हान येथून रेती घेऊन निघालेला ट्र्क एम एच -३२ ए जे ७७७३ हा यवतमाळ कडे येत असताना ट्र्क चालकाने ट्र्क चापर्डा गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभा केला होता. दरम्यान नागपूरवरून भरधाव येणाऱ्या पी.बी .११ -सी.बी. ४९६३ या क्रमांकाच्या कारने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चेंदामेंदा झाला कारमध्ये पाच जण होते त्यातील चार जागीच ठार झाले व एक जखमी झाला.माहिती मिळताच कळंब पोलिस घटनास्थळी आले .त्यांनी जखमीला तातडीने कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले .त्याठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यावर त्याला यवतमाळ येथे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अद्याप मृतक व जखमींची ओळख पटली नसल्याने त्यांची नावे समजू शकली नाही.