38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अर्ज करतांना मध्यस्थींपासून सावध रहा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अर्ज करतांना मध्यस्थींपासून सावध रहा

0
104

blank

 गोंदिया, दि.16 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अर्ज करतांना तालुक्यात काही बिगर शासकीय व्यक्ती शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करुन अर्ज मंजूर करुन आणण्याची हमी देतात. अर्ज करणे व अर्ज मंजूर होण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही बिगर शासकीय व्यक्तीचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज मंजूर करुन देण्याच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता कृषि विभागाचे मार्गदर्शन घेऊन सदर योजनेअंतर्गत अर्ज सादर करावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी गोंदिया पवन मेश्राम यांनी केले आहे.

        शेतकरी शेतात काम करीत असतांना अपघात घडून आल्यास उदा. विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, खुन, उंचावरुन पडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्त्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू इत्यादी बाबी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत समाविष्ट आहेत.

       सन 2023-24 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरु झालेली आहे. अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्याचे वारसदार यांनी अनुदानाचा प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 30 दिवसात सादर करावा. प्रस्ताव तयार करतांना येणाऱ्या अडचणी विषयी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा कृषि विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी अथवा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाची मदत घ्यावी.

       अपघातग्रस्त शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे दक्षता पथक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल तहसिलदार यांचेकडे आठ दिवसात सादर करतात. तालुका कृषि अधिकारी यांच्याकडून छाननी झालेल्या प्रस्तावावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये मदत देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येतो.

blank