
यवतमाळ,दि.२९ः यवतमाळात महाराष्ट्र शेतकरी परिषद २८ जुर्लेला पार पडली.या परिषदेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी शेतकरी नेत्यांनी एकत्र यावे असे विचार धनंजय पाटील काकडे यांनी व्यक्त करीत सरकार शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करीत असल्याची टिका केली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलन झाले . या परिषदेला शेतकरी नेते विजय भाऊ जावांदिया,वामनराव चटप,धनंजय पाटील काकडे,प्रकाश पोहरे,अमीर हबिब इत्यादी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी शेतकरी विरोधी कायदे या पुस्तकाचे लेखक सुभाष खंडागळे यांचा शाल व श्रीफळ देऊन रघुनाथ दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या परिषदेत केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे होत असलेली शेतकऱ्यांची लूट व त्यामुळे होत असलेल्या शेतकरी आत्महत्या, तसेच सामाजिक, राजकीय व शेतकरी समस्या विषयक अनेक ज्येष्ठनेत्यांची भाषणे झाली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक धनंजय पाटील काकडे म्हणाले- शेतकरी समस्या,कायदे ,न्याय व अधिकार हा विषय केंद्रातील धोरणाचा आहे , त्यासाठी आपण मागील लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेत्यांना केंद्रात पाठविणे हे गरजेचे होते.
परंतु आता तरी पुढील विधानसभेच्या निमित्ताने सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन लढा दिला तर एका मंडपाखाली सर्व नेते एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्रात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. परिवर्तन आघाडीच्या निमित्ताने चार पावले आपण पुढे आलात , काही नेते एकत्र येऊन जर दोन पावले अजून जास्त पुढे आले व ही शेतकरी समस्येसाठी लढाई लढले तर सामाजिक दृष्ट्या भूषनावह ठरेल. तेव्हा शेतकरी नेते एकत्र येणे ही काळाची गरज आहे. शेतकरी संघटनेचे नेते जर एकत्र येत नसेल तर , शेतकरी कसे एकत्र येतील असे त्यांनी सभेला संबोधित केले. पुढील राजकीय भूमिका घेण्यासाठी शेतकरी नेत्याची 15 ऑगस्ट 2024 ला दुपारी 11 ते 5 अकोला येथे बैठक घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते पाऊस असताना सुद्धा उपस्थित होते. विदर्भातून प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी, जेष्ठ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते . यावेळी सर्वच नेत्यांची भाषणे झाली. शेत जागल ट्रस्ट चे प्रमुख पुरुषोत्तमराव गावंडे यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महिलांना सानुग्रह अनुदान चेक द्वारे वाटप केले.