महामार्गावरील खड्ड्यात ‘बेसरम’ वृक्ष लावून नोंदविला निषेध

0
60

सडक/अर्जुनी : तालुक्याच्या सौंदड येथून नागपुर – रायपुर महामार्ग गेलेला आहे. या महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहेत. या खड्यामुळे अनेकांचा जीव गेला, पण विभागाची झोप उघडली नाही. रस्ता दुरूस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस महामार्गावरील खड्डे घातक ठरू लागले आहेत. या प्रकाराला संतापून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने सौंदड येथे महामार्गावरील खड्ड्यात बेशरम वृक्षाची लागवड करून आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या दुर्लक्ष धोरणा निषेध नोंदवून आक्रोश व्यक्त करण्यात आला.

सडक अर्जुनी तालुक्यातून रायपूर-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. महामार्गावरील सौंदड गावशिवारात रस्ता अत्यंत जर्जर आणि धोकादायक झाला आहे. महामार्गावर पावसामुळे ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने वाहन धारकांना अंदाज येत नाही. परिणामी अपघात घडून येत आहे. दररोज एक ना एक अपघात होत आहेत. या अपघाताच्या मालिकेत आतापर्यंत अनेकांना आपला जीव द्यावा लागला आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग म्हणून नावारूपास येऊ लागला आहे. असे असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लक्ष देताना दिसून येत नाही. परिणामी रस्ता हा नागरिकांच्या जीवावर उठला आहे.

या संदर्भात अनेकदा पत्र व्यवहार करण्यात आले. परंतु, रस्ता दुरूस्तीला घेवून प्रशासन झोपेचे सोंग करीत आहेत. या बाबीला संतापून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बेशरम वृक्षाची लागवड करून शासन, प्रशासनाच्या कृतीचा निषेध नोंदविण्यात आला. आंदोलन करीत रस्ता दुरूस्त करावा, अशा मागणीचे निवेदन जनप्रतिनिधी व यंत्रणेला देण्यात आला. जर यापुढेही विभागाकडून रस्ता दुरूस्तीला घेवून पुढाकार घेण्यात आला नाही तर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून महामार्गावरील वाहतूक बंद पाडणार, असा इशाराही देण्यात आला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व महिला जिल्हाध्यक्ष मंजू डोंगरवार, जिल्हा महासचिव बिसराम सलामे, जिल्हा सचिव महेंद्र निकोडे, तालुकाध्यक्ष विलास चकाटे यांनी केले. यावेळी महिला तालुकाध्यक्ष आरती जांगडे, अरुण आचले, मुकेश आचले, अखिल यावलकर, राकेश यावलकर, माधुरी फाये, रूपचंद इरले, सतीश आचले, शारदा खेकरे, सूर्यवंशी, सादिक शेख, आय.एम.माहुर्ले, प्रीतम गोबाडे, नेहा साखरे, येशुकाबाई राऊत, अश्विनी यावलकर, चेतन यावलकर, हेमराज इरले, दुर्गेश राऊत, रोहित नंदरधने यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.