नागपूर : जवळपास १४० वर्षांची परंपरा लाभलेला देशातील फक्त एकाच शहरात साजरा केला जाणारा ‘मारबत उत्सव’ अंधश्रद्धा व अनुचित परंपरा व संकटांचा नायनाट व्हावा म्हणून ओळखला जातो. नागपूरची रसाळ आणि तर्री पोहा यापेक्षा वेगळी नागपूरचा मारबत उत्सव प्रसिद्ध आहे. एकमेव नागपूर शहरात हा मारबत उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून होतो. राज्यविकास पर्यटन मंडळाने मान्यता दिलेल्या नागपूर शहराने वर्षानुवर्षे मार्बत मिरवण्याची परंपरा जपली आहे. आणि त्यामुळे संपूर्ण देशातील मारबत मिरवणुकीच्या वेगळेपणासाठी नागपूर शहर प्रसिद्ध आहे. यंदा मोठा (बैल) पोळ्याच्या दुसर्या दिवशी अर्थात मंगळवारी, ३ सप्टेंबरला मारबत उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. बदलापूर आणि कोलकाता येथील घटनेत महिलांवरील अत्याचाराचा निषेध करणारा आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांची मत मिळवणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात बडगे यावर्षीचे खास आकर्षण होते. घेऊन जा गे बडग्या… अशा घोषणा देत तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
दरवर्षी राजकीय नेत्यांवर भाष्य करणारे बडगे असतात, यावेळी मात्र एकही बडगा मिरवणुकीत नव्हता हे विशेष. शहराचा व्यापारी परिसर असलेल्या इतवारीतील जागनाथ बुधवारी परिसरातून सकाळी पिवळी मारबतीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. तर काळ्या मारबतची मिरवणूक नेहरू पुतळ्याजवळील पोहा ओळीतून सुरू झाली. काळी आणि पिवळी मारबतीचे नेहरू पुतळ्याजवळ मिलन झाल्यानंतर, खऱ्या अर्थाने मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहचला होता. यावेळेचे खास आकर्षण म्हणजे बदलापूर आणि कोलकाता येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करणारे वेगवेगळ्या संघटनांचे सात बडगे मिरवणुकीत सहभागी झाले होते. या सर्व बडग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
मारबत उत्सव म्हणजे नागपूर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा. नागपूरमध्ये दरवर्षी बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी पिवळी व काळी मारबत तसेच बडग्यांची भव्य मिरवणूक धूमधडाक्यात काढली जात आहे. काळ्या मारबतीची सुरुवात १८८० मध्ये, तर पिवळ्या मारबतीची सुरुवात १८८४ मध्ये झाली होती. देशविदेशात चर्चा व वेगळी ओळख मिळालेल्या या उत्सवाला जवळपास १४० वर्षांची परंपरा लाभली आहे. संपूर्ण देशात हा उत्सव फक्त नागपुरातच साजरा केला जातो. कोरोना काळाचा अपवाद वगळता यात कधीच खंड पडला नाही.
अगदी प्लेगची साथ (१८९७) आणि दंगे (१९२७) सुरू असतानाही हा उत्सव कुठल्याही अडथळ्याविना पार पाडल्या गेला होता. या ऐतिहासिक प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या-वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे (मोठे पुतळे) तयार केले जातात. या वैशिष्ट्यांमुळे शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यांमधून लाखो नागरिक मारबत मिरवणूक बघण्यासाठी आवर्जून येतात. आणि उत्सवाचा आनंद उपभोगतात.पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीलाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमिटीतर्पेâ गेल्या १३५ वर्षापासून इतवारीस्थित नेहरू पुतळ्याापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जात आहे. सगळ्यात पूर्वी काळ्या मारबतीचा उत्सव साजरा व्हायचा.
परंपरेला विशेष महत्त्व
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यांच्याकडून होत असलेल्या जुलमी कारनाम्यांनी जनता त्रस्त होती. त्यावेळी भोसले घराण्यातील बकाबाईने इंग्रजांशी हातमिळणी केली. त्याचा निषेध करण्यासाठी १८८१ पासून काळी मारबत मिरवणूक काढण्यात येते. नेहरू पुतळ्याजवळील हनुमान मंदिरात ही काळी (Marbat festival) मारबतीचे पूजन होते. ब्रिटीश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. परकीय गुलामगिरीचे पाश तुटून देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तर्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. ती परंपरा आजही सुरू आहे. या परंपरेला नागपूर शहरात विशेष महत्त्व आहे.