जिल्हा प्रशासनाने केला 65 टीबीमुक्त ग्रामपंचायतीचा सत्कार

0
496
  • गोंदिया,दि.१४ः- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सन २०२५ पर्यंत संपूर्ण भारत क्षयरोगमुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळ्यानिमित्त 65 ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.याप्रसंगी उर्वरित ग्रामपंचायतींनीही टीबीमुक्तीसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
    दि.14 ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव नाईक सभागृहात 65 ग्रामपंचायतींना त्यांनी टीबीमुक्त केलेल्या कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधींजीचा पुतळा स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व टिबी क्षयरोग जंतुशोध जनक रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.कार्यक्रमास जिल्हाधिकारी प्रजीत नायर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कापसे,जिल्हा क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे,डॉ.देव चांदेवार व कुष्ठरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री गांवडे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे उपस्थित होते.
    क्षयरोग दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा निर्माण करणे आणि त्यांच्या योगदानाचे सार्वजनिक रित्या गौरव करणे असे या उपक्रमाचे उद्देश असल्याचे डॉ.गोल्हार यांनी प्रास्तविकमध्ये सांगितले.गोंदिया जिल्ह्यात वर्ष 2023 साठी 65 ग्रामपंचायती यांची निवड होवुन आज सन्मानित करण्यात येत असल्याचे सांगितले.गोंदिया तालुक्यातील 14, सडक अर्जुनी तालुक्यातील 11, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 10,तिरोडा तालुक्यातील 09, आमगाव तालुक्यातील 08, गोरेगाव तालुक्यातील 05, सालेकसा व देवरी तालुक्यातील प्रत्येकी 4 ग्रामपंचायतीचा आज गौरव करण्यात आले.
    यावेळी जिल्हाधिकारी प्रजीत नायर म्हणाले की, केंद्र सरकारच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण गोंदिया जिल्हा टीबीमुक्त करण्याची संधी आहे.पुढील कालावधीत उर्वरित ग्रामपंचायतींनीही या अभियानात सहभाग घेऊन आपले गाव टीबीमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुन सामुहिक चळवळ निर्माण करावी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियानाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून झाली असून, प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानात आपणही निक्षय मित्र बनून साहाय्य करू शकतो. सन २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारत करायचे स्वप्न असून, त्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करणे आवश्यक असल्याचे सांगितले.आरोग्य विभागाने क्षयरोग उपचारासाठी आवश्यक प्रचार प्रसिद्धी तसेच लोकसहभागातून निक्षयमित्र योजनेतुन गोरगरीब क्षयरोग रुग्णांसाठी फूड बास्केट उपलब्ध करुन मोठ्या प्रमाणात काम करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या आहेत.

    टीबी मुक्त गाव अभियानातील उपक्रम आरोग्य विभागाने काटेकोरपणे राबविल्याने ग्रामपंचायती टीबी मुक्त झाल्या आहेत.यात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरंपच, ग्राम पंचायत सदस्य यांनी गावपातळी टीबी फोरम समिती स्थापन करुन जनजागृती निर्माण केली आहे. गावपातळीवरची आशा सेविकापासुन उपकेंद्र स्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट,आशा गट प्रवर्तक व सर्वच क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले असल्यामुळेच 65 ग्रामपंचायतीने जिल्ह्याचे नावलौकीक केले असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी सांगितले.चालू वर्षात मोठ्या संख्येने ग्रामपंचायती अभियानात सहभागी होऊन क्षयरोगमुक्त होण्यासाठी पुढे यावे व क्षयरोग उच्चाटनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.
    सदर टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा कार्यक्रमात 65 ग्रामपंचायतीचे सरपंच,तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक सन्मानासाठी निंमत्रित केले होते. कार्यक्रमाला आरोग्य विभाग व जिल्हा क्षयरोग केंद्राचे एस.टी.एस.,एस.टी.एल.एस,टीबीएचव्ही.,पी.पी.एम.,कार्यक्रम समन्वयक, पर्यवेक्षक यांचेसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार व सुत्रसंचालन जिल्हा पी.पी.एम.समन्वयक प्रज्ञा कांबळे यांनी केले.