
गोंदिया दि.२८:: महाविकास आघाडीकडून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसने स्थानिकांना डावलून तिरोडा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिलीप बन्सोड यांना उमेदवारी दिल्याने संतप्त काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी अर्जुनी मोर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा ताफा अडवून त्यांच्याविरोधात घोषणा देत त्यांना जाब विचारला.
यावेळी नाराज शेकडो कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
अर्जुनी मोर विधानसभेसाठी मविआकडून काँग्रेसचे उमेदवार दिलीप बन्सोड यांचे उमेदवारी अर्जदाखल करण्यासाठी नाना पटोले आज सोमवारी अर्जुनी येथे दाखल झाले. तिरोडा येथून पार्सल पाठवून स्थानिक उमेदवारांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान पक्ष विरोधी कार्य करीत असल्याची माहिती पक्षाच्या प्रदेश कार्यालयाला प्राप्त झाली असून डॉ. अजय लांजेवार व राजेश नंदागवळी यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केल्याची माहिती दिली. त्यामुळे कार्यकर्ते आणखी संतप्त झाले. स्थानिक इच्छुकांची व कार्यकर्त्यांची चूक काय? असा प्रश्न केला. यावर पटोलेंनी आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगीतले.
उमेदवारीसाठी मुलाखती दिलेल्या इच्छुकांनी 27 रोजी पत्रकार परिषद घेऊन दिलीप बनसोड यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करीत पटोलेंनी अर्जुनी मोरगाव विधानसभेसाठी पार्सल रुपी दिलेला उमेदवार परत घेऊन स्थानिकांना उमेदवारी देण्याची भूमिका घेतली. पटोलेंनी योग्य निर्णय न घेतल्यास बन्सोड यांच्या विरुद्ध अपक्ष निवडणूक लढवू अशी भूमिकाही ईच्छूकांनी घेतली. त्यामुळे काँगे्रस उमेदवार बन्सोड यांच्या अडचणी वाढणार आहेत.





