
गोंदिया, दि.29 : येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात सर्व विधानसभा क्षेत्रात जय्यत तयारी सुरू झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून 63-अर्जूनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात मतदार संघात 26 व 27 ऑक्टोबरला मतदान केंद्राधिकारी व मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण संपन्न झाले.
सदर प्रशिक्षण दोन टप्प्यात पार पडले. प्रथम टप्प्यात त्यांना पीपीटी च्या साह्याने प्रशिक्षण देण्यात आले आणि द्वितीय सत्रात हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजेच प्रत्यक्ष मतदान यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षण जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी मोरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी वरुणकुमार सहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे व सडक अर्जुनीचे तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी वरूणकुमार शहारे व अनिरुद्ध कांबळे यांनी पीपीटी च्या साह्याने प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाला जवळपास दोन हजार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर प्रशिक्षण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तर प्रात्यक्षिक प्रशिक्षण अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय येथे देण्यात आले. या प्रशिक्षणांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्याची आणि अधिकारांचे जाणीव करून देण्यात आली तसेच निवडणूक सुरू होण्यापूर्वी, सुरू असताना आणि नंतर करावयाची कामे जबाबदारीने आणि काळजीपूर्वक करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .
या प्रशिक्षणामध्ये मतदानाच्या वेळी मतदान यंत्रे हाताळणी बाबत तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी सर्व यंत्रे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खात्री करणे, वेळेवर मतदान सुरु करणे तसेच वेळेवर बंद करणे, दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी काढणे, मतदान प्रक्रिया सुरू होण्याअगोदर मॉक पोल घेणे, मतदान कार्यपद्धती ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसे हाताळावे, मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी सुलभता व्हावी तसेच मतदान प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊ नये या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.





