35.9 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home राजकीय भंडारा जि.प.अध्यक्षपदावर काँग्रेसच्या कविता उईके,उपाध्यक्षपदावर अजित पवार गटाचे एकनाथ फेंडर

भंडारा जि.प.अध्यक्षपदावर काँग्रेसच्या कविता उईके,उपाध्यक्षपदावर अजित पवार गटाचे एकनाथ फेंडर

0
277

blank

भंडारा : काँग्रेस आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर अखेर काँग्रेसच्या कविता उईके यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे एकनाथ फेंडर यांनी ३० मते घेऊन विजय मिळविला. भाजपच्या उमेदवार माहेश्वरी नेवारे यांचे सदस्यपद ऐन निवडणुकीच्यावेळी रद्द झाल्याने काँग्रेसच्या कविता उईके या एकमेव उमेदवार असल्याने त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. तर बहुमत असतानाही भाजपला अर्थात महायुतीला अध्यक्षपदापासून दूर रहावे लागले. जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. भाजपकडे माहेश्वरी नेवारे या उमेदवार होत्या. तर काँग्रेसकडे कविता उईके या उमेदवार आहेत. परंतु, निवडणुकीच्या तोंडावर माहेश्वरी नेवारे यांच्या जातप्रमाणपत्राविरोधात कविता उईके न्यायालयात गेल्या. त्यानंतर माहेश्वरी नेवारे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले. याविरोधात त्या उच्च न्यायालयात गेल्या. उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्त यांचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे माहेश्वरी नेवारे यांना सदस्यपदावरुन अपात्र ठरविण्यात आले आहे. परिणामी, त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढता आली नाही.
आज सोमवारी प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या कविता उईके या एकमेव उमेदवार असल्याने त्यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. काँग्रेसच्या या खेळीने भाजपचा अध्यक्षपदाचा डाव उधळला गेला. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे देवेंद्र इलमे, महायुतीतून भाजपचे विनोद बांते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे एकनाथ फेंडर यांची अर्ज दाखल केला. भाजपचे विनोद बांते यांनी अर्ज मागे घेतल्याने देवेंद्र इलमे आणि एकनाथ फेंडर यांच्यात निवडणूक झाली. जि.प. सभागृहात बोलविण्यात आलेल्या विशेष सभेत ५२ ऐवजी ५१ सदस्यांनी हात वर करुन मतदान केले. यात देवेंद्र इलमे यांना काँग्रेसचे २१ तर एकनाथ फेंडर यांना महायुतीचे ३० मते पडली. त्यामुळे एकनाथ फेंडर यांना विजयी घोषीत करण्यात आले. सदस्यपद रद्द झाल्याने भाजपाचे माहेश्वरी नेवारे यांना निवडणुकीत भाग घेतला आले नाही. त्यामुळे महायुतीच्या ३१ पैकी ३० सदस्यांनी मतदान केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन, आ. डॉ. परिणय फुके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल आदी महायुतीचे नेते उपस्थित होते.