पनवेल:-पनवेल जवळील कर्नाळा किल्ल्यावर आज शनिवारी धक्कादायक प्रकार घडला आहे. किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या ४० ते ५० पर्यंटकांनी गोंधळ घातला. त्यामुळे मधमाशांचे मोहोळ उठले. मधमाशांनी केलेल्या हल्यानंतर धावपळ उडली. त्यात एकाचा मृत्यू झाला. तसेच मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले. मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रायगडमधील पनवेल तालुक्यात कर्नाळा किल्ल्यावर नेहमी पर्यटकांची गजबज असते. या किल्ल्यावर शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. १५ फेब्रुवारी रोजी ट्रेकिंगसाठी किल्यावर आलेल्या पर्यटकांपैकी एका पर्यटकाला आपले प्राण गमवावे लागले. मधमाशांच्या हल्ल्यात अजून पाच पर्यटक जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी सकाळी सुट्टी असल्याने शेकडो पर्यटक कर्नाळा किल्यावर आले होते. यामध्ये मुंबई येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचा मोठा समूह आला होता.
त्याचसोबत काही पालक आपल्या मुलांना कर्नाळा किल्यावर पर्यटनासाठी घेऊन आले होते. ४० ते ५० पर्यटकांचा गोंधळ किल्ल्यावर झाला. त्यामुळे मधमाशा भडकल्या. त्यांनी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. पर्यटकांमध्ये धावपळ उडाली. ट्रेकिंगला जाताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ट्रेकिंगला जाताना फर्फ्युम, अत्तर किंवा डिओ लावून जाऊ नये. सुगंधामुळे माशा आक्रमक होतात. मधमाशांचा हल्ला झाल्यास धावाधाव न करता शांतपणे यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. तसेच जंगलातून ट्रेकिंग करताना प्राणी, पक्षी तसेच इतर जीवांना त्रास होणार नाही असे कृत्य करु नये असा सल्ला अनेक ट्रकिंग ग्रुप देतात.