गोंदिया,दि.०३ः महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी आयोजित दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारोहाचे आयोजन २९ मार्च रोजी गुरुनानक शाळेचे सभागृह गुरुनानक स्कूल गोंदिया येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ नरेश वैद्य, प्रमुख अतिथी म्हणून गोंदिया जि.प.माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.महेन्द्र गजभिये, जि.प.प्राथ.शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, डायटचे अधिव्याख्याता पुनम घुले, भाऊराव राठोड, लेखाधिकारी वैद्य, बी.आर.सी साधन व्यक्ती बडवाईक मॅडम, ठेंगडी मॅडम, नागपूरे मॅडम, जीभकाटे मॅडम, अंकला मानेम,वशिष्ठ खोब्रागडे व इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी राज्य शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त गोंदिया जिल्ह्यातील वर्ग 1 ते 12 व अध्यापक विद्यालय गटातील सर्व विषयातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकांचा डायट व शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एस.सी.ई.आर.टी तर्फे 15 लाखांचा नगदी पुरस्कार व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांसाठी समर्पित तसेच सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रगत राहून सतत कार्य करणारे व व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये विजेते सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी गोंदिया जिल्ह्यातील तब्बल विविध विषयात दर्जेदार व्हिडिओ निर्मिती करणाऱ्या 75 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित जी.ई.एस हायस्कूल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडी येथे कार्यरत मराठी व इतिहास विषयाचे अध्ययन अध्यापनाचे कार्य करणारे तंत्रस्नेही शिक्षक आर.एस.पी.अधिकारी विनोदकुमार माने यांना जिल्हास्तरीय दोन व राज्यस्तरीय दोन असे चार पुरस्कार देण्यात आले. तर गोंदिया शिक्षण संस्था अध्यापक विद्यालयातील प्रा.कु. टीना पन्नालाल ठाकरे यांना अध्यापक विद्यालय या गटातून याआधी राज्यस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सत्कार पुणे येथे करण्यात आले होते.आज जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच गोंदिया शिक्षण संस्था अध्यापक विद्यालयातील प्रा.कु.विद्या हिरामण येटरे, प्रा.कु. मीनाक्षी तरुण कटरे यांना शिक्षण प्रशिक्षणाची निगडित आधुनिक विचार प्रवाह या विषयांतर्गत अध्यापक गटांतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
सदर पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल, गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन,संचालक निखिल राजेंद्र जैन यांनी अभिनंदन व्यक्त करीत भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.