जयंती उत्सव समिची मागणी : आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन
—–
तिरोडा, ता. 4 : खैरलांजी मार्गावरील मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्याला जोडणाऱ्या आंतराज्यीय उड्डाण पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुल असे नाव देण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीती तिरोडाच्या वतीने आमदार श्री. विजय रहांगडाले यांना करण्यात आली आहे. रविवारी (ता. ४) आमदार श्री विजय रहांगडाले यांची भेट घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने त्यांना निवेदन देवून सविस्तर चर्चा करण्यात आली. निवेदन देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विजय बनसोड, उपाध्यक्ष राजेश गुनेरीया, महाप्रज्ञा बुध्द विहार समितीचे माजी अध्यक्ष अतुल गजभिये, जयंती उत्सव समितीचे सचिव जितेंद्र डहाटे, कोषाध्यक्ष विनोद चव्हाण, सदस्य रामू शहारे, राहुल मेश्राम, किशोर डहाटे यावेळी उपस्थित होते. दोन राज्यांना जोडणाऱ्या या उड्डाण पुलाची सुरुवात महाप्रज्ञा बुध्द विहाराजवळून होत आहे. शिवाय या भागात मोठ्याप्रमाणात आंबेडकरी अनुयायी राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार असून भारतीय संविधानाची निर्मीती करून बाबासाहेबांनी या देशावर मोठे उपकार केले आहे. शहरात डॉ बाबासाहेब यांचे नाव देण्यात आलेली एकही मोठी शासकीय वास्तू नसल्याचे समितीच्या वतीने मा. आमदार विजय रहांगडाले यांच्या लक्षात आणून देण्यात आले. यावर विधायक प्रतिसाद देत उड्डाण पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव देण्यात येईल, यासाठी सर्वोतोपरि प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार विजय रहांगडाले यांनी दिली. त्यामुळे आता खैरलांजी मार्गावरील उड्डाण पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुल असे नाभिधान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.