गोंदिया, दि.5 : अन्न व औषध प्रशासन गोंदिया कार्यालयास प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि.3 मे 2025 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी पी.व्ही.मानवतकर यांनी गोंदिया शहरातील मेसर्स माँ शक्ती एजन्सीज, घमंडी बिअरबार जवळ, भैरव बाबा मंदिर समोर, बावली, गोंदिया या ठिकाणी छापा टाकून भेसळीच्या संशयावरुन बालाघाट येथून आलेला ‘टोस्ट’ हमसफर ब्रॉण्डचा नमूना घेवून उर्वरित साठा 88 किलो, किंमत 3520 रुपये जप्त केला. सदरचे टोस्ट हे 6 किलोच्या कारटुन बॉक्समध्ये विक्रीस असल्याचे निदर्शनास आले. टोस्ट या अन्नपदार्थाच्या बॉक्सवर उत्पादकाचा पूर्ण पत्ता, उत्पादन दिनांक, बॅच नंबर, FSSAI परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळून आले. सदर प्रकरणी विक्रेता अशोककुमार रहानदोमल ज्ञानचंदानी यांच्याकडून नमूना घेण्यात आलेला आहे व पुढील कार्यवाही सुरु आहे.
अन्नपदार्थ खरेदी करतांना त्याच्या वेष्टनावर (बॅग/बॉक्सवर) उत्पादकाचा पूर्ण पत्ता, उत्पादन दिनांक, बॅच नंबर, सदर अन्नपदार्थाचा सर्वोत्तम कालावधी, FSSAI परवाना क्रमांक नमुद असलेले अन्नपदार्थच खरेदी करावेत. अन्नपदार्थ ज्या नावाने खरेदी केले आहे त्याचे खरेदी बील स्वत:कडे ठेवावे, असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांनी केले आहे.