गोंदिया, दि.5 : शासनाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना कायमस्वरुपी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या प्रचार-प्रसार व जनजागृती करण्यासाठी गोंदिया जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जैन संघटन व सहयोगी सुहाना स्पाईसेस यांच्याद्वारे गोंदिया जिल्ह्यामध्ये जनजागृती करणाऱ्या जलरथाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम व निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सत्यजीत राऊत, सहायक अधीक्षक संजय धार्मिक, सहायक महसूल अधिकारी सर्वश्री पी.झेड.बिसेन, अमोल गजभिये, नोकलाल कटरे, माधुरी मेश्राम, सोनाली भोयर, हरिश्चंद्र पौनीकर (डीपीएम), योगेश वैकुंठी (नरेगा), बिजेएस पदाधिकारी गोरेगाव सौरभ जैन, बिजेएस जिल्हा समन्वयक रोशन गायधने उपस्थित होते.
जलरथाद्वारे गावा-गावामध्ये जाऊन तलावाचे पुनरुज्जीवन करण्याकरीता माहिती देवून मागणी अर्ज करण्याकरीता महाराष्ट्र शासनाचे शिवार पोर्टल व बिजेएस ॲपची माहिती देऊन मागणी अर्ज करण्याबाबत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोफत गाळाचे महत्व, तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे फायदे, शेत शिवारामध्ये माती टाकल्याने होणारे फायदे इत्यादी माहिती जलरथाद्वारे पुरविली जाणार आहे.
तलावातील गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी महाराष्ट्र राज्यात एकच दर निश्चित करण्यात आलेला आहे. पात्र स्वयंसेवी संस्था किंवा ग्रामपंचायत या कामासाठी अर्ज करुन जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पध्दतीनुसार काम करता येईल. तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त कुटूंब शेतकऱ्यांना शासनाकडून निश्चित दराने अनुदान दिले जाणार आहे.