महावितरण अभियंत्याला मारहाण करणा-याला न्यायालयाचा दंड

0
45

नागपूर, दि. 5 मे 2025: – महावितरणच्या अभियंत्याला शिवीगाळ करणाऱ्याला तसेच त्याच्या कानशिलात लगावणाऱ्याला सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. तालेकर यांनी एकूण साडे दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असुन दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे

शेख छोटेसाहेब शेख नवाब (वय 40), रा. बाबा फरीदनगर, खरबी) असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर महावितरणचे सहाय्यक अभियंते हरीश मुंगसे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा आरोप आहे. ही घटना 28 एप्रिल 2023 रोजी वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मुंगसे हे त्यावेळी खरबी परिसरातील कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. आरोपी छोटेसाहेब तेथे आला. त्याला महावितरणकडून वीजेचे मीटर बदलविण्यासाठी फोन आला होता, असे त्याचे म्हणणे होते. यावरून तो कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागला. मुंगसे त्याला समजावू लागले, यावर छोटेसाहेबने त्यांना शिवीगाळ करीत  मारहाण केली.

याप्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात सदर आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 186, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी शेख छोटेसाहेब शेख नवाब याचेवर कलम 353,332 आणि 186 अन्वये दोषी ठरवित कलम 353 अन्वये सार्वजनिक सेवकांना त्यांच्या कर्तव्य बजावताना हल्ला किंवा जबरदस्ती करणे किंवा त्यांना त्यांच्या कामापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा जबरदस्ती करण्याप्रकरणी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास त्याला एक महिन्याची साधी कैद याशिवाय कलम 352 अन्वये पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास त्याला एक महिन्याची साधी कैद आणि कलम 186 अंतर्गत पाचशे रुपये दंड भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दंड न भरल्यास त्याला एक आठवड्याची साध्या कैदेची शिक्षा ठोठावित त्याला दिलेला जामीन देखील रद्द केला आहे.